मुंबई : पवईतील उच्चभ्रू हिरानंदानी गार्डन परिसरातील पवई प्लाझा येथील स्पा केंद्रात मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. पवई पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून या स्पा केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत १८ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली असून, स्पाच्या व्यवस्थापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांना हिरानंदानी गार्डन परिसरातील पवई प्लाझा येथील एका स्पा केंद्रात देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तपास सुरू केला. हा ग्राहक स्पा केंद्रात पोहोचल्यानंतर त्याची भेट व्यवस्थापिकेशी झाली. त्याने मसाज सेवेबाबत विचारणा केली असता, मसाजसाठी दोन हजार रुपये, तर शारीरिक संबंधांसाठी अतिरिक्त तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे तिने सांगितल्याचा आरोप आहे.

यानंतर व्यवस्थापिकेने एका तरुणीला ग्राहकासोबत खोलीत पाठवले. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने संकेत दिल्यानंतर पवई पोलिसांच्या पथकाने स्पा केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत संबंधित तरुणीची सुटका करण्यात आली. तिची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली. स्पा केंद्रात सुरू असलेल्या बेकायदा व्यवहारासंदर्भात पोलिसांनी पुरावेही गोळा केले.

या प्रकरणी व्यवस्थापिका भारती हिच्याविरोधात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कथित देहव्यापाराच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच स्पा केंद्राच्या मालकाची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.