मंत्रालयानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांतील वीज खंडित ; आठवडाभरातील दुसरी घटना; मागणी वाढल्याने वाहिन्यांवर भार

मागील आठवडय़ात मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला आणि ऑनलाइन हजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपर्क तुटला होता.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई :  मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना वीजपुरवठा खंडित होऊन आठवडा उलटत असताना मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यात सायंकाळी  वीजपुरवठा खंडित झाला.

मुंबईतील वीजमागणीचा अतिरिक्त ताण बेस्टच्या विद्युत यंत्रणेवर येत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचे सांगण्यात आले. मागील आठवडय़ात मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला आणि ऑनलाइन हजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपर्क तुटला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला चिमटाही काढला होता. त्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच मंगळवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. मंगळवारी सकाळी मरिन ड्राइव्ह परिसरात १० वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाला आणि त्याचा फटका मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना बसला.

या वेळी मंत्र्यांच्या बंगल्यांवर विविध कामांसाठी आलेले नागरिक, अधिकारी यांची वर्दळ होती. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह अनेकांना अंधारात व उकाडय़ात काम करावे लागले. जवळपास दीड तासाने संपूर्ण परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाला.  मागणी वाढल्यानेच ताण  वारंवार होणाऱ्या या प्रकारांबाबत बेस्टकडे विचारणा केली असता, उकाडय़ामुळे मुंबईतील वीजमागणीत वाढ झाली आहे. भारनियमन न होता मुंबईकरांना अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी मागणीप्रमाणे आम्ही प्रसंगी खुल्या बाजारातून वीज घेऊन वीजपुरवठा करत आहोत. बेस्टच्या विद्युत यंत्रणेवर वीजमागणीचा ताण आल्याने तांत्रिक बिघाड झाला. साडेपाच वाजता बिघाड झाला होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. टप्प्याटप्प्याने सात वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Power cut in minister s bungalow in front of mantralaya mumbai zws

Next Story
शाळेच्या अध्यक्षाला अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी