scorecardresearch

कचऱ्यापासून केलेली वीजनिर्मिती वाहनांच्या चार्जिगसाठी; हाजी अलीमध्ये पालिकेचा प्रयोग

ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिकेने आता या विजेचा वापर बॅटरीवरील गाडय़ा चार्ज करण्यासाठी करण्याचे ठरवले आहे.

(इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिग स्टेशनचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.)

मुंबई : ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिकेने आता या विजेचा वापर बॅटरीवरील गाडय़ा चार्ज करण्यासाठी करण्याचे ठरवले आहे. हाजी अली येथे गेल्यावर्षी सुरू झालेल्या या छोटय़ा वीजनिर्मिती प्रकल्पाला आता इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिग स्टेशन असून त्याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
हाजीअली आणि महालक्ष्मी रेसकोर्स याच्याजवळ असलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ दीड हजार चौरस फुटाच्या जागेवर पालिकेच्या डी विभाग कार्यालयाने दररोज दोन मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू केला होता. विभागातील कचरा या छोटय़ा प्रकल्पात जिरवून त्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकून दिलेल्या अन्नपदार्थावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
या प्रकल्पातील विजेचा वापर करून आता गाडय़ांसाठी चार्जिग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, टाकून दिलेल्या अन्नपदार्थापासून निर्मिती करण्यात आलेल्या विजेचा उपयोग करून इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषत: महामार्गावर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पामध्ये दररोज २ मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून ३०० ते ५०० युनिट वीज तयार होऊ शकते. या ठिकाणी चार्जिगसाठी दोन पॉईंट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे एका वेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होवू शकतील. दिवसाला सहा गाडय़ा चार्ज होऊ शकतात, अशी माहिती ‘डी’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Power generation waste charging vehicles municipal experiment haji ali amy

ताज्या बातम्या