सत्तेच्या चाव्या पश्चिम उपनगरांच्या हाती!

राज्य सरकारने वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईमधील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ पर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

लोकसंख्या वाढल्याने प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता; राजकीय पक्षांचे मतपेढय़ांवर लक्ष

मुंबई : राज्य सरकारने वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईमधील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ पर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांमधील लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील सत्तेचे गणित पश्चिम उपनगरांतील संख्याबळावर निश्चित होईल असा कयास बांधला जात आहे. सत्तेचे गणित लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी पश्चिम उपनगरांतील मतपेढय़ांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या मुंबईत पालिकेचे २२७ प्रभाग असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १०२ प्रभाग पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरांत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे.

पालिका प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये मुंबईतील प्रभाग फेररचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाला सादर केला. शिवसेनेने त्यात स्वत:च्या सोयीनुसार बदल केल्याचा आरोप भाजपने त्यावेळी केला होता. फेररचनेच्या कच्च्या आराखडय़ात  पश्चिम उपनगरातील प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल केल्याचा आरोप भाजपने केला होता. मागील निवडणुकीत भाजपने काबीज केलेले पश्चिम उपनगरांतील बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी शिवसेना मोर्चेबांधणी करीत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

आसन व्यवस्था अपुरी

मुंबईतील प्रभागांची पर्यायाने नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यामुळे पालिका वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. मुंबई महापालिकेत सध्या २२७ अधिक पाच नामनिर्देशित नगरसेवक असे एकूण २३२ नगरसेवक आहेत. भविष्यात प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाल्यानंतर नामनिर्देशित नगरसेवकांसह एकूण नगरसेवकांची संख्या २४१ वर जाण्याची शक्यता आहे. नगरसेवकांची संख्या वाढल्यास पालिका सभागृहातील आसन व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता आहे. पालिका सभागृहातील बैठकीस सर्व पक्षीय नगरसेवकांबरोबरच चिटणीस विभागातील कर्मचारी, आयुक्त कायर्लयांतील कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. अनेकदा सभागृहात बसायला जागा मिळत नाही. एकाच वेळी नगरसेवकांची १०० टक्के उपस्थिती नसते. त्यामुळे जागेची कमतरता फारशी जाणवत नसली तरी मतदानासारखा प्रसंग असल्यास सभागृहात नगरसेवकांची उपस्थिती १०० टक्के असते. अशा वेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यास जागाच मिळत नाही. बहुमताचा आकडा ११९ वर

गेल्या दीडशे वर्षांत वेळोवेळी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत वाढ होत गेली. लोकसंख्या वाढीच्या आधारे आतापर्यंत नगरसेवकांची संख्या ६४ पासून २३६ पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढत गेली आहे. सध्या पालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ असून कामकाज सुरू होण्यासाठी ४५ सदस्यांची गणसंख्या आवश्यक असते, तर बहुमताचा आकडा ११४ आहे. सत्ता स्थापनेसाठी ज्या पक्षाचे नगरसेवक अधिक त्यांची सत्ता असे गणित असले तरी प्रस्ताव मंजूर करताना बहुमताचा आकडा ग्राह्य धरला जातो. नगरसेवकांची संख्या २३६ झाल्यास गणसंख्या ४७ होईल तर बहुमताचा आकडा ११९ होणार असल्याची शक्यता चिटणीस विभागातील सूत्रांनी वर्तवली.

प्रभागवाढीमुळे निवडणुका लांबणीवर?

प्रभागसंख्या  वाढणार असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Power hands western suburbs ysh

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या