रेल्वे वाहतुकीलाही विजेचा झटका

उपनगरी सेवा ठप्प, मेल-एक्स्प्रेस विलंबाने; प्रवाशांचे हाल

रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले

उपनगरी सेवा ठप्प, मेल-एक्स्प्रेस विलंबाने; प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबई महानगर परिसरासह अन्य भागांत दोन तास खंडित झालेल्या वीजपुरवठय़ाचा फटका पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय सेवेलाही बसला. लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले; तर मेल-एक्स्प्रेस एक ते दीड तास उशिराने सुटल्या. जागीच थांबलेल्या लोकलमुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना स्थानकाबाहेरील वाहतुकीचा पर्याय निवडावा लागला.

वेगवेगळ्या कंपन्यांकडून रेल्वेलाही विद्युतपुरवठा होत असतो. मात्र हा पुरवठा सकाळी १०.०५ मिनिटांनी बंद झाला आणि लोकल सेवेला मोठा फटका बसला. ओव्हरहेड वायरला होणारा विद्युतपुरवठाच बंद झाल्याने मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, पनवेल येथून सीएसएमटीला जाणाऱ्या, तर पश्चिम रेल्वेवरील विरार येथून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा जागीच थांबल्या. हीच परिस्थिती डाउनला जाणाऱ्या लोकल गाडय़ांचीही होती. दहा ते पंधरा मिनिटे लोकल जागेवरून हलत नसल्याने अनेक प्रवाशांना प्रश्न पडला. त्यातच रेल्वे स्थानकातील उद्घोषणाही बंद झाल्याने प्रवासी गोंधळात होते. बऱ्याच वेळाने विद्युतपुरवठय़ातील तांत्रिक समस्येमुळे लोकल सेवेला फटका बसल्याचे समजले.

दोन स्थानकांदरम्यान लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी रुळावर उतरून जवळचे स्थानक गाठणे पसंत केले. ही पायपीट करताना प्रवाशाना घाम फुटला. महिला प्रवाशांच्या मदतीला लोहमार्ग पोलीस, सुरक्षा दलही पोहोचले. अशा ३०० पेक्षा अधिक प्रवाशांना स्थानकापर्यंत सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. मुंबई व नवी मुंबईतील काही भागांत विद्युतपुरवठा सुरू होताच ओव्हरहेड वायरलाही होणारा पुरवठा सुरळीत झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११ वाजता सुरू झाली. दुपारी एकच्या सुमारास मध्य तर दुपारी १२.२० वाजता पश्चिम रेल्वे रुळावर आली.

 

मेल-एक्स्प्रेस प्रवाशांनाही फटका

सकाळी विद्युतपुरवठा खंडित होताच ओव्हरहेड वायरलाही तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने त्याचा परिणाम मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवर झाला. वांद्रे टर्मिनसहूून अमृतसरला जाणारी सकाळी सव्वाअकराची गाडी दुपारी एक वाजता, तर याच मार्गावर दुपारी १२ वाजता सुटणारी गाडी दुपारी सव्वाएक वाजता आणि वांद्रे टर्मिनस-जोधपूर गाडी दुपारी दीडऐवजी एक तास उशिराने सोडण्यात आली. मध्य रेल्वेवरील दुपारी १२ आणि त्यापाठोपाठ दुपारी सव्वाबारा वाजता सुटणाऱ्या दोन एलटीटी-गोरखपूर, दुपारी १२.४० वाजताची एलटीटी थिरुवनंतपुरम, तर दुपारी सव्वाएक ते दोनच्या दरम्यान सुटणाऱ्या एलटीटी दरभंगा आणि वाराणसी गाडय़ाही एक ते दीड तास उशिराने सोडण्याचा निर्णय घेतला. परिणामी प्रवाशांना स्थानकात बराच वेळ ताटकळत राहावे लागले आणि पुढील प्रवासही उशिराने झाला.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Power outage in mumbai hit local trains service zws