मुंबई : ब्रिटिशकालीन प्रभादेवी उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम सुरू झाले. परंतु, रेल्वे मार्गावरील पाडकाम करण्यासाठी ब्लाॅकची आवश्यकता असून त्यासाठी महारेल प्रशासनाने ब्लाॅकची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे मागणी केली. मात्र, अद्याप ब्लाॅकचे नियोजन न झाल्याने पुलाचे पाडकाम रखडले आहे.प्रभादेवी उड्डाणपूल ब्रिटिश काळात बांधला.

या पुलाला ११२ वर्षांहून अधिक काळ लोटला असून दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा पूल होता. परंतु, हा पूल बंद केल्याने, वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजलेत. वाहतूकदारांना करी रोड किंवा टिळक पुलावरून प्रवास करावा लागतोय. याठिकाणीही त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

या पुलाच्या रेल्वे भागातील पाडकाम आणि बांधकाम करण्याची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल, एमआरआयडीसी) यांना दिली. पुलाचे काम वेगात होण्यासाठी महारेल प्रशासनाने कंबर कसली. या पुलाच्या पोहच मार्गांचे काम करण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली. पुलाच्या परळ पोहचमार्गाचे पाडकाम पूर्ण झाले असून, प्रभादेवी पोहचमार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, रेल्वे भागातील १३२ मीटर पुलाच्या पाडकामासाठी तयारी सुरू केली आहे.

तीन आठवड्यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे ब्लाॅकबाबत मागणी केली. याबाबत त्यांच्याकडून नियोजन सुरू आहे. ब्लाॅक मिळाल्यास, त्वरीत कामाला सुरू केली जाईल. मध्य आणि पश्चिम रेल्वेची मार्गावरून सतत लोकल सेवा धावत असते. लोकल, एक्स्प्रेसच्या सेवेला कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून ब्लाॅकविना हे काम करणे अशक्य आहे. पुलाच्या कामासाठी ७० ते ८० ब्लाॅकची आवश्यकता भासेल, अशी माहिती महारेलच्या अधिकाऱ्याने दिली.पुलाच्या पाडकामाबाबत परवानगीबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ब्लाॅकबाबत निर्णय घेतला जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने ब्लाॅकचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेवरील पुलाचे पाडकाम होईल. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील पुलाचे पाडकाम होईल. परळ दिशेच्या भागात ८०० मेट्रिक टनाची क्रेनची व्यवस्था केली आहे. रेल्वे भागातील पुलाचे पाडकाम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

एकूण लांबी – १३२ मीटर

पुलाचा खालील भाग (लोअर डेक) – पदपथासह २ – २ मार्गिका, स्थानिक वाहतुकीसाठी पूर्व-पश्चिमेला जोडणे शक्य होईल.

पुलाचा वरील भाग (अपर डेक) – शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडणारा २ २ मार्गाचा पूल असेल. या भागावर पदपथ नसेल. या पुलामुळे थेट अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूला ये-जा करणे सोयीस्कर होईल.

प्रकल्पाची अंदाजे खर्च – १६७.३५ कोटी रुपये