मुंबई : प्रभादेवी (एल्फिन्स्टन) उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याने या उड्डाणपुलावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावरून चालवले जाणारे बसमार्ग परावर्तित अथवा खंडीत करण्यात आले आहेत. त्यामुळे या बसमार्गाला एकमेव पर्याय असलेल्या बसमार्ग क्रमांक ४० मध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या कारणास्तव बसमार्ग क्रमांक ४० वरील बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान या मार्गावरील बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

वरळी – शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवी पूल पाडण्यात आल्यामुळे बेस्ट उपक्रमाचे काही बसमार्ग खंडीत करण्यात आले आहेत. तर अनेक मार्ग वळवावे लागले आहेत. बसमार्ग खंडीत केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, या परिसरातील नागरकांची मोठी गैरसोय होत आहे. तर प्रभादेवी पुलावरून जाणारे बसमार्ग खंडीत झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उरले नाहीत.

वरळी – शिवडी उन्नत मार्गाच्या बांधकामामुळे प्रभादेवी पश्चिमेकडून परळ – शिवडीकडे येणारे बस क्र. ए-१६२, १६८ व २०१ हे मार्ग प्रभादेवी पर्यंतच सुरू आहेत. हे बसमार्ग बंद झाल्यामुळे दादर (प.) येथे जाणारे अनेक विद्यार्थी, तसेच नागरिकांना सध्या शिवडी बस आगारातून दादर पश्चिमेस जाणारी बस क्र. ४० ही एकमेव बस आहे. वरील तिन्ही बसने जाणारे प्रवासी बस क्र. ४० ने वीर कोतवाल उद्यानापर्यंत प्रवास करून पुढील प्रवास अन्य बसने करीत आहेत. त्यामुळे या बसमार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र या मार्गावरील बसगाड्यांची संख्या कमी असल्यामुळे बसगाड्या खच्चून भरून जातात. त्यामुळे या मार्गावरील बसगाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवून केली होती. त्यांच्या या पत्राला बेस्ट प्रशासनाने उत्तर दिले असून बसमार्ग क्रमांक ४० वरील बसगाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बस मार्ग क्रमांक ४० हा प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी – दिंडोशी दरम्यान धावते. या मार्गावरील बसगाड्या शिवडी, हिंदमाता, दादर टीटी, दादर प्लाझा अशा मार्गाने पुढे जातात. त्यामुळे शिवडीकडून दादर पश्चिमेकडे जाणाऱ्यांना सध्या ४० क्रमांकाची बस हा एकमेव पर्याय आहे. दादर विभागात असलेल्या शाळांमध्ये शिवडीमधील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ही बस सेवा उपयुक्त आहे. शारदाश्रममधील विद्यार्थी व पालक आता ४० नंबरने प्रवास करून दादर टी टी येथे उतरतात आणि तेथून दुसरी बस पकडून शारदाश्रम शाळेकडे जातात. त्यामुळे ४० नंबरची बससेवा वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा तसेच ४० नंबर बस दादरला पोचल्यानंतर तिथून शारदाश्रम शाळेसाठी दुसरी बस लगेच उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी पडवळ यांनी केली होती.

बेस्ट उपक्रमाकडून दिलासा ….

बसमार्ग क्रमांक ४० वरील बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी प्रथमतः बसताफ्यात वाढ करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत उपक्रमाकडे असलेला अपुरा बसताफा विचारात घेता बसमार्ग क्र. ४० वरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यास उपक्रम असमर्थ आहे. परंतु प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता इतर बसमार्गावरील बसगाड्या बसमार्ग क्र.४० वर वळविण्यात येत असल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे. तसेच उपक्रमाकडे पुरेसा बसताफा उपलब्ध झाल्यावर बसमार्ग क्र.४० वरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्याबाबत प्राधान्यक्रमाने निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.