मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी (एलफिन्स्टन) रेल्वे उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय ‘महारेल’ने घेतला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये जागा ताब्यात मिळाल्यापासून वर्षभराच्या आत बांधकाम करण्याचे उद्दिष्ट महारेलने ठेवले आहे. प्रभादेवी उड्डाणपूल ब्रिटिशकाळात बांधण्यात आला होता व ११२ वर्षांहून अधिक काळ हा पूल दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा भाग होता. या उड्डाणपुलाची गतिशीलता वाढवण्याच्या उद्देशाने जुना प्रभादेवी उड्डाणपूल पाडून, त्याजागी नवा दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला (महारेल) प्रभादेवी येथे दुमजली उड्डाणपुलाचे पाडकाम व बांधकाम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम व बांधकाम महारेल करणार आहे. महारेलने दिलेल्या माहितीनुसार, पुलासाठी आवश्यक चारही पोलादी स्पॅन १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईत आणण्यात आले आहेत. यात ९२.५ मीटरचे दोन व ३४.५ मीटरचे दोन स्पॅन असून, ते सध्या चेंबूर व पनवेल येथील यार्डत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
पुलाच्या तुळया स्थापित करण्यासाठी आवश्यक ‘नाईट कॉरिडॉर ब्लॉक’ संदर्भातील सविस्तर आराखडा मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सादर केला आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी तुळया उभारण्याचे नियोजनाची पाहणी करून काही तांत्रिक मुद्द्यांवर सुधारणा सुचवल्या असून, त्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव रेल्वे मुख्यालयातील मुख्य पूल अभियंता व प्रधान मुख्य अभियंता यांच्याकडे पाठवला जाईल.
तुळया उभारणीसाठी व पूर्वतयारीसाठी २५ दिवसांच्या कालावधीत प्रत्येकी अडीच तासांचे एकूण ३९ कॉरिडॉर ब्लॉक आवश्यक असतील. त्यापैकी ३२ ब्लॉक्स दोन मुख्य पोलादी स्पॅन बसविण्यासाठी वापरले जातील. रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात असून, प्रभादेवी उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महारेलद्वारे देण्यात आली.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
दुमजली रचना : प्रभादेवीचा उड्डाणपूल एकाच वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गिका ओलांडून तयार केला जाईल.
एकूण लांबी : १३२ मीटर
पुलाचा खालील भाग (लोअर डेक) : पदपथासह २ २ मार्गिका, स्थानिक वाहतुकीसाठी पूर्व-पश्चिमेला जोडणे शक्य होईल.
पुलाचा वरील भाग (अप्पर डेक) : शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडणारा २ २ मार्गाचा पूल असेल. या भागावर पदपथ नसेल. या पुलामुळे थेट अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूला ये-जा करणे सोयीस्कर होईल.
प्रकल्पाचा अंदाजे खर्च : १६७.३५ कोटी रुपये
