नेमकं २ ऑक्टोबरला काय घडलं? पंच प्रभाकर साईलनं सांगितला सविस्तर घटनाक्रम, वानखेडेंवर धक्कादायक आरोप

ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे कोटी लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने केलाय. एनसीबीचे

Sameer-Wankhede-4

ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने केलाय. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलंय. आपल्या जीवाला धोका असल्यानं एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईल यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.

केपी गोसावी यांने मला मुंबईला बोलावलं. त्याने सांगितलेल्या लोकेशनवर मी पोहोचलो असता ते एनसीबीचे कार्यालय निघाले. तिथे काही वेळाने केपी गोसावी आणि एक एनसीबी अधिकारी आले, त्यांच्यापाठोपाठ समीर वानखेडे आले. हे तिघेही दोन गाड्यांमध्ये निघून गेले. काही वेळाने ते परत आले, थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि क्रूझच्या गेटवर पोहोचलो, हे सर्व २ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता घडलं. दरम्यान, काही वेळाने गोसावी याने काही फोटो पाठवून त्या लोकांना मला ओळखण्यास सांगितलं. त्या १०-१२ लोकांपैकी मी केवळ एका व्यक्तीला ओळखू शकलो. काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्या व्यक्तीसह एकूण १३ जणांना पकडल्याचं केपी गोसावीने सांगितल्याचा दावा साईल यांनी केलाय. तसेच त्याने पाठवलेल्या फोटोंपैकी एक मुनमुन धमेचा होती, असं साईलने सांगितलं.

आर्यनला रात्री १२ वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आणलं. त्यानंतर पंचाच्या सह्या करण्यासाठी गोसावीने आपल्याला एनसीबी कार्यालयात बोलावलं. वर गेल्यानंतर साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी मला कोऱ्या कागदावर सह्या करायला सांगितल्या. मी नकार दिला असता समीर वानखेडेंनी काहीच होणार नाही, तू सही कर असं म्हटलं. तेव्हा मी जवळपास १० कोऱ्या कागदावर सह्या केल्या, असं साईल यांनी सांगितलं.

दरम्यान, कार्यालयात बसल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचं दिसतंय. काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला. त्यानंतर सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली, असं साईलने सांगितलं.

त्यानंतर किरणने मला ५० लाख रुपये आणायला जायला सांगितलं. इंडियाना हॉटेलजवळ गाडीतल्या दोघांनी पिशव्या दिल्या, त्यात पैसे होते. ते पैसे घेऊन मी सांगितल्याप्रमाणे वाशीला परत गेलो आणि पैसे गोसावीला दिले. मी पोहोचलो तेव्हा गोसावी कुठेतरी जायच्या तयारीत होता. दुसऱ्या दिवशी गोसावीने फोन करून बोलावलं आणि पैशाची पिशवी सॅमला दिली. दरम्यान, गोसावीने समीर वानखेडेंना पैशांच्या डीलसंदर्भात माहिती देण्यासाठी व्हॉट्सअप कॉल केल्याचा दावा साईलने केलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prabhakar sail allegations on sameer wankhede in cruise case hrc

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या