मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना संधी दिली. भाजपचे एकूण ८९ नगरसेवक जिंकून आलेले असले तरी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संधी दिलेले प्रभाकर शिंदे ४४ वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेत होते, तर २०१७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे सभागृह नेता म्हणून कारकीर्द गाजवलेले प्रभाकर शिंदे हे आता प्रथमच स्थायी समिती अध्यक्षपदी असतील.

मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक झाल्यानंतर आता स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी १८ फेब्रुवारीला अर्ज भरण्यात आले. शिवसेना (ठाकरे) पक्षाने या समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने प्रभाकर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुलुंडच्या प्रभाग क्रमांक १०६ मधून निवडून आलेले प्रभाकर शिंदे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाकर शिंदे आतापर्यंत एकूण पाच वेळा निवडून महापालिकेत दाखल झाले. त्यापैकी दोन वेळा ते भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत.

१९७३ पासून शिवसेनेत

वय वर्ष ६७ असलेले प्रभाकर शिंदे यांच्या राजकीय प्रवासातील निम्म्याहून अधिकचा काळ तेव्हाच्या एकसंघ शिवसेना पक्षात गेला आहे. उपशाखाप्रमुख पदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. शाखाप्रमुख, भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. ते १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बेस्ट समिती अध्यक्ष, सभागृह नेते अशी पदे त्यांना शिवसेनेने दिली होती. मात्र स्थायी समिती अध्यक्ष पद शिवसेनेने कधीही दिले नव्हते. शिवसेनेकडून त्यांनी चिपळूणमध्ये विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा भाजपचे गटनेते म्हणून त्यांनी सभागृहात काम केले.

प्रभाकर शिंदे यांची संपत्ती किती

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले प्रभाकर शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एकूण संपत्ती ही १७ कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे तीन वाहने असून त्यात एमजी हेक्टर प्लस मोटार (२१ लाख), टाटा अम्ब्युलन्स (६ लाख ४८ हजार ) व टोयोटा इनोव्हा (२० लाख ) आहे. तसेच पत्नी व स्वत:कडे मिळून २७० ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत ३८ लाख रुपये आहे. तर चिपळून, रत्नागिरी, दापोली या ठिकाणी एकूण ११ भूखंड आहेत. त्यांची एकूण जंगम व स्थावर मालमत्ता १७ कोटी ६३ लाख रुपये इतकी आहे. त्यांची संपत्ती २०१७ मध्ये ११ कोटी ९० लाख रुपये इतकी होती. गेल्या आठ नऊ वर्षात त्यात सहा कोटी रुपयांनी वाढ झाली. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४२ लाख रुपये आहे.

१९७३ मधे शिवसैनिक या नात्याने राजकारणात प्रवेश

१९८० मधे मुलुंड पूर्व शाखेचा उपशाखाप्रमुख

१९९२ मधे मुलुंड पूर्व शाखेचा शाखाप्रमुख

१९९४ मधे भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष

१९९७ मुलुंड पूर्व मधून नगरसेवक

१९९८ महापौर परिषद सदस्य

१९९९ बेस्ट समिती अध्यक्ष

२००१ बेस्ट समिती अध्यक्ष

२००२ पुन्हा नगरसेवक

२००२ ते २००६ मुंबई महापालिका सभागृह नेता

२००७ तिसऱ्यांदा नगरसेवक

२०१७ भारतीय जनता पक्षात प्रवेश

२०१७ चौथ्यांदा नगरसेवक

२०१८ चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रभारी

२०२० भाजपा गटनेतेपदी निवड

२०२६ पाचव्यांदा नगरसेवक