मुंबई : ठाणे येथील शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (बाळू पूर्णेकर) हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करून पुर्णेकर कुटुबीयांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, प्रकरणाचा तपास अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. त्यावेळी, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्यांना सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागण्याची मुभा राहील, असे स्पष्ट केले.
एसआयटीतर्फे सुरू असलेल्या तपासाबाबत पुर्णेकर कुटुंबीय असमाधानी आहे. याशिवाय, प्रकरणातील साक्षीदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवावी, अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही याचिकाकर्ते प्रकरणातील मूळ तक्रारदार मंदार घोडके यांनी वकील मयूरी हटले यांच्यामार्फत केलेल्या याचिकेद्नारे व्यक्त केली आहे. आतापर्यंत अनेक पुरावे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद चित्रफिती तपास यंत्रणेला देण्यात आल्या. मात्र, त्याकडे एसआयटीने दुर्लक्ष केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने (एसटीएफ) अटक केलेल्या संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली याने प्रयागराज न्यायालयात या हत्याप्रकरणाबाबत सांगताना, विभागप्रमुख आणि नगरसेवक यांच्यातील वादातून ही हत्या झाल्याचा दावा केला. त्याबाबतची संबंधित कागदपत्रेही सादर केली गेली आहेत. मात्र, स्थानिक एसआयटीने या माहितीचा तपास अहवालात किंवा आरोपीच्या कोठडीच्या मागणीच्या रिमांडमध्ये उल्लेख केलेला नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे तपास अन्य यंत्रणेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणई याचिकेत करण्यात आली आहे.
प्रकरण काय ?
गेल्या २९ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ठाण्यातील मानपाडा येथील पूर्णेकर यांच्या कार्यालयात त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास कऱणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सुभाष उर्फ पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार, मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि त्याचा साथीदार अमित सिंग उर्फ पल्लू यांचा समावेश आहे.
