मुंबई : कर्जत-भिमाशंकर येथील जंगलातील वृक्षतोड ज्या टोरंटो कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी सुरू आहे, त्या कंपनीने मोठ्या प्रमाणात निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड) विकत घेतले होते. त्यातील भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ७६ कोटी, काँग्रेसला १७ कोटी, आम आदमी पक्षाला ७ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला ३.५ कोटी आणि शिवसेनेला ३ कोटी रुपयांचा पक्ष निधी रोख्यांच्या रूपाने मिळाला आहे, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. सह्याद्री परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. या परिसरात विकासाची कामे होणार नाहीत, असे केंद्र सरकारने युनेस्कोला हमीपत्र दिले आहे. तरीसुद्धा टोरंटोसारखे ५ वीज प्रकल्प सह्याद्रीत सुरू आहेत. महायुती सरकार सह्याद्रीचे वाळवंट करायला निघाले आहे. रायगडमध्ये ५ वीज प्रकल्प होत आहेत, यातून तीन चतुर्थांश रायगड जिल्हा बाधित होणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात राज्य सरकारने दिलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

भांडवलशाहीने भाजप या सत्ताधारी पक्षाला आपल्या खिशात ठेवल्याचे माहीत होते. मात्र, त्यांनी विरोधकांचे मौनही विकत घेतले आहे. निवडणूक रोख्यांच्या रूपाने विरोधकांना मोठ्या प्रमाणात पक्षनिधी टोरंटो कंपनीकडून मिळाला आहे. म्हणूनच विरोधकांची टोरंटो प्रकल्पासंदर्भात भूमिका मवाळ झाली आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.

टाटा पॉवर हाऊसमधील पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते. ते पाणी पाइपलाइनने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांना देता येऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस पाण्याच्या तुटवड्याची पूर्णपणे असत्य माहिती देत असून वीज प्रकल्प जनतेच्या फायद्याचे असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा साफ खोटा आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

भारतात येत असलेली डेटा सेंटर अमेरिकन कंपन्यांची आहेत. मात्र अमेरिकन जनताच ही डेटा सेंटर तिथून हाकलून देत आहे. कारण डेटा सेंटर थंड करण्यासाठी अडीच हजार कोटी लिटर पाणी लागते. एका अमेरिकन कंपनीसोबत अदानी कंपनीचा डेटा सेंटरबाबत करार झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अनेक धरणे बांधली जात आहेत. ही धरणे जनतेसाठी बांधली जात नसून डेटा सेंटरसाठी बांधली जात आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.