मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशात मध्यरात्री ११ ते २ वाजेपर्यंत ५ टक्के मतदान झाल्याचा दावा केला आहे. हे विधान अत्यंत गंभीर असून आंध्र प्रदेशात निवडणूक भ्रष्टाचार करून आंध्र प्रदेशात तेलुगू देशम – भाजपने सरकार स्थापन केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही असाच भ्रष्टाचार झाला असून यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. भाजपच्या नेत्यांनीच आता त्यांचे बिंग फोडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉक्टर प्रभाकर हे चांगले अर्थतज्ज्ञ व विश्लेषक आहेत. त्यांनी २०२४ च्या आंध्र प्रदेशाच्या निवडणुकीच्या पॅटर्नचे विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, निवडणूक संपल्यानंतर ५ टक्के मतदान हे मध्यरात्री ११ ते २ च्या दरम्यान टाकण्यात आले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत गंभीर आहे.

एवढा मोठा भ्रष्टाचार करून भाजपने आंध्र प्रदेशात सरकार स्थापन केले. याचा लाभ चंद्राबाबू नायडू यांना लाभ झाला. त्यामुळेच एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतरही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शांत बसले आहेत. ते कसलीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. हा घोटाळा महाराष्ट्रात झालेल्या घोटाळ्यासारखाच आहे. महाराष्ट्रातही मतदानाची वेळ संपल्यानंतर ७६ लाख मतदान करण्यात आले. याविरोधात चेतन अहिरे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांनी चेतन अहिरे हे महाराष्ट्राची निवडणुकीला कसे आव्हान देऊ शकतात, असा सवाल केला. चेतन अहिरे हे भारतीय नागरिक, मतदार आहेत. तो जर न्यायालयात आव्हान करू शकत नसेल तर कोण करू शकते? याचा खुलासा कोर्टाने करावा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हा बेकायदेशीर, असंविधानिक आणि बनवाट असून राहुल गांधी यांनी केलेले ‘वोट चोरी’चे आंदोलन बराेबर आहे. ज्या मतदारांचे नाव कापण्यात आले आहे, त्यांची कुठल्या प्रभागात नावे होती? किती नावे वगळण्यात आली? हे जर दाखवून दिले असते, तर त्यांच्या आंदोलनात वजन आले असते. राहुल गांधींना जर त्यांनी दिलेली आकडेवारी सिद्ध करायची असेल तर न्यायालय हे एकमेव व्यासपीठ आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर गांभीर्याने विचार करावा, असे आंबेडकर म्हणाले.