मुंबई: देशात मुस्लीमांप्रमाणे अनेक अल्पसंख्याक गट आहेत. या अल्पसंख्याक गटांमध्ये धार्मिक बाबींवर चर्चा होते. मुस्लीम समाजावर मात्र अजूनही मौलवींच्या विचारांचा पगडा आहे. मुस्लीम धर्मावर चर्चा करत नाहीत. त्याचा फटका मुस्लीम समाजाला बसला असून हे चित्र बदलण्याशिवाय मुस्लींमाना तरणोपाय नाही, अशी रखड भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
वंचितचे प्रवक्ते फारुक अहमद यांच्या ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ या ग्रंथाचे ॲड. आंबेडकर यांच्या हस्ते शनिवारी दादरच्या आंबेडकर भवन येथे प्रकाशन झाले. हे पुस्तक प्रत्येक मुस्लीम वस्त्यांमध्ये वाचले गेले पाहिजे आणि यावर मौलवींसोबत चर्चा झाली पाहिजे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. भाजप आणि संघाविरोधात भक्कम पर्याय उभा करण्यासाठी काँग्रेसने इतर धर्मनिरपेक्षा गटासोबत आघाडी करावी यासाठी मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले.
मुस्लीम समाजाला पारंपरिक राजकीय चौकटीत राहून चालणार नाही. वंचित आणि अल्पसंख्याक समाजाशी सामाजिक-राजकीय सलोखा निर्माण करत मुस्लीम समाजाने व्यापक आघाडी उभी केली पाहिजे. यामध्ये समान नागरी कायद्याचा मुद्दा महत्वाचा आहे. समान नागरी कायद्याच्या मुद्यावर मुस्लीम समाजाने अभ्यासक-विचारवंत यांच्याशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या अहवालामध्ये पुढच्या काही महिन्यात भारतात मोठा नरसंहार हाेवू शकतो, असा इशारा दिला असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
द वायरच्या संपादिका आरफा खानुम शेरवानी यांनी मतदारांच्या अधिकारांवर होत असलेल्या अतिक्रमणांवर यावेळी चिंता व्यक्त केली. माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रेहमान यांनी मुस्लीमांसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. पत्रकार नवीन कुमार यांनी समानता फक्त आंबेडकरवादी चळवळीत असल्याचे नमूद केले. कॉ. स्मिता पानसरे यांनी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांची संयुक्त राजकीय ताकद उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जेव्हा मुसलमानांवर अन्याय झाला, तेव्हा संघटना आणि चळवळींनी भाजप- संघाच्या विरोधात उभे राहात मुस्लिम समाजाची बाजू घेतली आहे. या संघर्षाचे दस्ताऐवजीकरण होणे पुढील पिढ्यांसाठी आवश्यक असल्याचे वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. प्रबुद्ध भारतच्या संपादक अंजली मायदेव-आंबेडकर, वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, जमाअत-ए-इस्लामचे जनाब मुज्तबा फारुक, इतिहास अभ्यासक सरफराज अहमद, लेखक कलिम अजिम या प्रकाशनाला उपस्थित होते.
