काँग्रेसच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र, काही पक्षांना या आघाडीत सहभागासाठी निमंत्रणच न दिल्याने काँग्रेसवर सडकून टीकाही होत आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी न करून घेतल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी टीका केली. आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) एक ट्वीट करत भूमिका मांडली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.”
“लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या…”
“इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या हेतूंवरच प्रश्न उपस्थित केले.
“काँग्रेसने एकदाचं जाहीर करावं की ते आंबेडकरवादाच्या विरोधात”
दरम्यान याआधी वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही काँग्रेसवर टीका केली होती. ते म्हणाले होते, “काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे कुठल्यातरी वेगळ्याच दुनियेत जगत असावेत किंवा त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींची माहिती मिळत नसावी अशा पद्धतीची ते विधानं करत आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा जाहिररीत्या सांगितलं आहे की, वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’ आघाडीचा भाग होऊ इच्छिते. तशी वंचितची तयारी आहे. याचा अनेकदा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांना याबाबत काहीच माहिती कशी नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते.”
“काँग्रेसने एकदाचं जाहीर करावं की ते आंबेडकरवादाच्या विरोधात आहेत”
“काँग्रेसने एकदाचं जाहीर तरी करून टाकावं की, ते आंबेडकरवादाच्या विरोधात आहेत, आंबेडकरवाद्यांच्या विरोधात आहेत. त्यांना वंचित बहुजनांचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे चालत नाही हे त्यांनी एकदाच जाहीर तरी करावं,” असं म्हणत सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसला घेरलं.
हेही वाचा : “मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस, मी जेव्हा…”; अण्णा हजारेंचा उल्लेख करत राऊतांचा हल्लाबोल
“‘इंडिया’च्या बैठकीत सामील सगळेच पक्ष निमंत्रणाशिवाय सहभागी”
“ज्या धार्मिक विधींचा एकेकाळी वंचित बहुजनांना अधिकार नव्हता, त्या धार्मिक विधीबरोबर इंडिया आघाडीची तुलना करून विजय वडेट्टीवार नेमकं काय सांगू पाहत आहेत ते आम्हाला कळत नाही. मात्र, एक मात्र झालं की, विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे आम्हाला हे कळालं की इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील झालेले सगळेच पक्ष हे निमंत्रणाशिवायच बैठकीत सहभागी झाले होते”, असं म्हणत मोकळे यांनी टोला लगावला.