मुंबई: आयआयटी मुंबई संस्थेतील २२ वर्षीय बी. टेक.चा दलित विद्यार्थी साहिल वाकोडे याने जातीय छळामुळे केलेल्या आत्महत्या प्रकरणी न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या आई-वडिलांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी दुपारी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी आंबेडकर यांच्यासोबत पत्नी अंजली मायदेव-आंबेडकर तसेच मुलगा सुजात आणि वंचितचे कार्यकर्ते होते. वकिलांनी या प्रकरणाची माहिती आंबेडकर यांना दिली. अद्यापपर्यंत या घटनेतील संशयितांना साध्या चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले नसल्याबद्दल आंबेडकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा संवेदनशील गुन्ह्यात मुख्यमंत्री महोदयांची भूमिका महत्त्वाची असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका तपासली पाहिजे. कारण त्यांच्या आदेशाशिवाय पोलीस या घटनेत हलगर्जीपणा करणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले.

१८ सप्टेंबर रोजी साहिलने आयआयटीच्या वसतीगृहात पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाने १० सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आयआयटी पलक्कडच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश व्यंकटेश्वरन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.

साहिलच्या कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केलेले प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना चौकशी प्रलंबित असेपर्यंत संस्थेने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. १८ सप्टेंबर रोजी परीक्षा सुरू असताना साहिलवर भ्रमणध्वनी वापरून कॉपी केल्याचा आरोप झाला होता, ज्यानंतर काही तासांतच त्याने वसतीगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. साहिलच्या पालकांनी आणि विद्यार्थी संघटनांनी यामध्ये जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर : आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेबंद कारभारामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून दोन महिन्यांत देशातील बँका अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताला मित्रराष्ट्र राहिले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कलानुसार मोदींचे परराष्ट्र धोरण आहे. त्यातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने इस्रायलला पाठिंबा दिला. मित्र कसे तोडायचे हे संघाकडून शिकण्यासारखे आहे. गेल्या ७० वर्षांत भारताच्या पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी झाली नव्हती. पण, त्यात भारतातील धर्मवाद्यांना काही गैर वाटत नाही, असे आरोप आंबेडकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर बुधवारी वंचितच्या वतीने इस्रायल विरोधात आणि इराणला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले.