मुंबई : एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेले भारताचे एकतर्फी व्यापार धोरण प्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान ‘मोदी हटाव, देश बचाव’ अशी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मातंग मुक्ती सेनेसह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसला आहे. शेतकऱ्यांचे व वस्त्रोद्योग क्षेत्राचे या करारामुळे कंबरडे मोडले आहे. भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. अमेरिकेतील बाललैंगीक आरोपी जेफ्री एपस्टीन याच्या ई-मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनेकदा उल्लेख आढळतो. यासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.
सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक भारतीय आखाती देशांमध्ये कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आखातामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्राकडे कोणतीही योजना नाही. मोदी सरकारच्या विदेशी नीतिने भारताचे जुने मित्र दूरावले आहेत. भारताच्या पंचशील धोरणाला मोदी यांनी मूठमाती दिली आहे. मोदींमुळे भारताची विदेशात प्रतिमा उंचावली नसून ती डागाळली आहे, अशी अशी टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.
या आंदोलनात रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्षा रुपवते, दिशा पिंकी शेख, सुजात आंबेडकर, चेतन अहिरे, स्नेहल सोहनी, सागर गवई, राजेंद्र पातोडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. वंचितने विविध संघटनांना बरोबर घेत सोमवारी केलेले आंदोलन पहिले होते. वंचित तळातील विविध जातघटकांना सोबत घेत पाया विस्तारत आहे.
मोदींविरोधात आघाडी :
या आंदोलनाला ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ असे नाव दिले होते. गेल्या काही महिन्यात वंचित बहुजन आघाडी सातत्याने थेट संघ परिवार, भाजप व मोदी यांच्यावर निशाणा साधत आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचितने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर नुकताच मोर्चा काढला होता. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली वंचितची आक्रमक आंदोलन होत आहेत. कालच्या सीएसएमटीच्या आंदोलनाची तयार सुजात यांनी केली होती.
