हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या प्रतिमेला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना शनिवारी लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. प्राण यांची तब्येत अगदी व्यवस्थित असून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणीही उगाचंच अफवा पसरवू नयेत, असे सांगत लीलावती रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. डगावकर यांनी या माहितीला पुष्टी दिली.
फाळणीपूर्वी लाहोरमध्ये पंजाबी चित्रपटांतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या प्राण यांचे मूळ नाव प्राणकिशन सिकंद असे आहे. फाळणीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईत आलेल्या प्राणसाहेबांनी विविध चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारली.
७०-८०च्या दशकात त्यांनी काही चरित्र अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या. यापैकी ‘हलाकू’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘हाफ तिकीट’, ‘जॉनी मेरा नाम’ या आणि अशा अनेक चित्रपटांतील भूमिका खूप गाजल्या होत्या.
गेल्या आठवडय़ात, शुक्रवारी, प्राण नेहमीच्या तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात गेले असताना त्यांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे इलाजासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट बातम्या पसरत होत्या. ९२ वर्षांच्या प्राण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची अफवा गुरुवारी रात्री पसरली होती. मात्र प्राण यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा निर्वाळा लीलावती रुग्णालयाने दिला. अभिनेते प्राण यांची तब्येत ठणठणीत असून आज, शनिवारी त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण लीलावती रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. डगावकर यांनी दिले. तसेच, प्राणसाहेबांच्या तब्येतीबद्दल कोणीही उलटसुलट अफवा पसरवू नयेत, अशी विनंतीही त्यांनी केली.