मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) यांच्या अंतर्गत पहिल्यांदाच राष्ट्रसंत तुकडोडी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द दिग्दर्शक अनंत महादेवन सांभाळणार असून अभिनेता प्रसाद ओक तुकडोजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मंगळवारी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला.

‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मंगळवारी नरिमन पॉईंट येथील यशवंत चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाला ॲड. आशिष शेलार यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. ‘महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून मानवी मूल्ये, राष्ट्रभक्ती, महान व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘खंजिरीचे बोल’ हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या ग्रामसेवा, परोपकार आणि भक्तीमार्गाच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे माध्यम ठरेल. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि प्रसाद ओक यांचा प्रभावी अभिनय यामुळे हा विषय अधिक ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल’, असा विश्वास व्यक्त करत शेलार यांनी चित्रपटाच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या.

या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर येथे होणार आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण हिमांशु दुबे यांचे असून संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शक संतोष फुटाणे आहेत, तर चित्रपटाची सहनिर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.

एकेकाळी समाज प्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम मानले जात होते. संतांच्या कीर्तनातून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असे. मात्र आधुनिक काळात ही परंपरा हळूहळू मागे पडताना दिसते आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारा, कार्यपद्धती आणि समाजासाठी केलेले कार्य व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि समाजप्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासह देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले.