मुंबई : मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनेते, गायक, निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रितू तावडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना शुक्रवारी नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सत्तेच्या काळात या पदावर आदेश बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी प्रशासकीय काळाच्या आधीच राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.
मुंबई महानगरपालिकाअंतर्गत ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ हे शहरातील क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे मुख्य व्यवस्थापन पाहते. हे प्रतिष्ठान अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल आणि मुलुंडचे कालिदास क्रीडा संकुल यांसारख्या प्रमुख सुविधांचे संचालन करते. मात्र या दोन्ही क्रीडा संकुलात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर या संकुलाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रशांत दामले यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.
प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत दामले यांच्या नियुक्तीच्या निर्णयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानुसार नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात दामले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते.
प्रशांत दामले यांच्याविषयी…
मूळचे मुंबईकर असलेल्या प्रशांत दामले यांना शालेय जीवनापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांना अभिनयाची आणि नाटकांची आवड निर्माण झाली. त्यांनी १९७८ ते १९८३ या काळात समांतर रंगभूमीवर काम करून आपल्या अभिनयाचा पाया मजबूत केला. १९८३ मध्ये आलेल्या ‘टूरटूर’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाने त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. त्यानंतर दामले यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
आजवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी तब्बल ३६ विविध नाटकांमधून १३,५३८ पेक्षा अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेत ४ लिमका बुक ऑफ रेकॉर्डस््मध्ये त्यांचे नाव कोरले गेले आहे. मागील तीन वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाची धुरा ते सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असतात.
