मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत लवकरच टाटा मोटर्सच्या पाच हजार बसेस दाखल होणार आहेत. या बस खरेदीची निविदा प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्ससारख्या नामांकित आणि विश्वासार्ह संस्थेने सादर केला आहे. त्यामुळे बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. नव्या पाच हजार ‘ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे.पुढील सहा महिन्यांत सुमारे पाच हजार हून अधिक जुन्या बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होणार आहेत.

एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ – २ आसन व्यवस्थेच्या २६४० बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत होत आहे. नव्या पाच हजार बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बसफेरीचा फायदा झाला नाही तरी चालेल; मात्र बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.