मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मागील आठवडयात झालेल्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांची व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात सादर करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले.

सरनाईक यांनी यासंदर्भात परिवहन व पोलीस अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रासायनाने भरलेला टँकर उलटल्याने ३ फेब्रुवारी रोजी अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली. तब्बल ३२ तास झालेल्या या कोंडीमुळे प्रवाशांचे विशेषत: महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले.

प्राथमिक पाहणी अहवालात चालकाच्या बेपर्वाईमुळे आणि वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, फॉर्म १३८ अ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात यावा. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सरनाईक यांनी सांगितले.

राज्यातील महामार्गावर काही अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट्स) निश्चित करण्यात आले आहेत. त्याची माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबविण्याच्या उपाययोजना तातडीने अमलात याव्यात. महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.

महामार्गावरील अपघात रोखण्याची इच्छा असेल तर नियमांची अंमलबजावणी नको तर ही एक चळवळ उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी परिवहन विभागाकडून व्यक्त केली.