मुंबई :– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा बुधवारी सायंकाळी अचानक दादरमधील त्यांच्या जुन्या घराकडे वळला.कृष्ण कुंज, भवानी शंकर रोड-दादर येथील या घराला कुलूप होते. मात्र, घराबाहेर वडील बाबुराव सरनाईक यांच्या नावाची पाटी पाहताच सरनाईक भावुक झाले. यावेळी त्यांच्या बालपणीचे काही मित्रही त्यांना भेटले. त्यांच्याशी संवाद साधत सरनाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सरनाईक यांचे बालपण याच घरात गेले. त्यांचे वडील बाबुराव सरनाईक हे ज्योतिर्विद, कवी आणि पत्रकार होते. याच घरातून त्यांनी साहित्य, पत्रकारिता आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला. वडिलांनी दिलेली कष्ट करण्याची वृत्ती, समाजाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी आणि आपल्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचे संस्कार आजही सार्वजनिक जीवनात मार्गदर्शक ठरत असल्याची भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.
जुन्या घराला भेट दिल्यानंतर सरनाईक यांनी परिसरातील बालपणीच्या मित्रांचीही विचारपूस केली. काही काळ त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कुलूपबंद घर आणि त्यावर असलेली वडिलांची नावाची पाटी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्याचे यावेळी दिसून आले.
