मुंबई : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या समुह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊन, म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरांचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार भवनाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणीस बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, महापौर रितू तावडे, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, तमिल सेल्वन, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.
राज्यात सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व असून, विशेषतः सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी शंभर टक्के डिजिटायझेशन, कार्यालयांचे विकेंद्रीकरण आणि विविध सुधारणा राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक सुविधा असलेले ‘सहकार भवन’ उभारण्याची संकल्पना साकार होत असून, त्यातून प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रशासकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या भवनात आधुनिक कॉन्फरन्स हॉल, प्रशिक्षण कक्ष आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्वयंपुनर्विकास धोरणामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळत असून, सध्या सुमारे १६०० हून अधिक प्रकल्प सुरू आहेत, तर अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या योजनांना वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी वित्तीय मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे २००० महिलांना स्वावलंबी बनविण्यात यश मिळाल्याचेही फडणीस यांनी नमूद केले.
राज्य सरकारने स्वयंपूर्ण विकासासाठी विविध सवलती व धोरणात्मक निर्णय घेतले असून, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. मुंबई बँकेने गिरणी व माथाडी कामगारांसाठी कर्जसुविधा, महिलांसाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहीम आणि व्याजमुक्त कर्ज योजना राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सहकार भवन उभारणीमुळे आधुनिक सुविधा, कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला नवी दिशा मिळेल, असे सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.
