मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या शीव, प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरातील चार इमारती अतिधोकादायक घोषित झाल्या आहेत. त्यामुळे या इमारती तातडीने रिकाम्या करण्याची प्रक्रिया मंडळाने सुरू केली आहे. मात्र, रहिवाशांनी तिथल्या तिथेच पुनर्वसनाची मागणी करून घरे रिकामी करण्यास विरोध केला होता. पण, आता मात्र लवकरच या रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन करून या इमारती रिकाम्या करण्यात येणार आहेत.
यासंबंधी नुकतीच एक बैठक पार पडली असून या बैठकीत २६५ रहिवाशांचे तीन वर्षांसाठी तात्पुरते स्थलांतर करून त्यांना प्रतीक्षा नगर समूह पुनर्विकासाअंतर्गत दोन नव्या स्वतंत्र इमारतींत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोसळलेल्या वा अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतरित केले जाते. त्यानुसार प्रतीक्षा नगर येथे संक्रमण शिबीर उभारण्यात आले असून तिथे एकूण ६५ इमारती आहेत. या इमारती धोकादायक झाल्या असून आयआयटीच्या संरचनात्मक अहवालानुसार टी ३६, ३७, ५३ व ५४ इमारती अतिधोकादायक बनल्या आहेत. या इमारतींखालून मुंबई महानगरपालिकेचा बोगदा गेला असून त्याचा धक्का लागल्याने इमारती अतिधोकादायक झाल्याचे म्हटले जाते.
बैठकीतील मुद्दे – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रतीक्षानगरचा समूह पुनर्विकास करण्यासाठी अभ्यास सुरू आहे. या समूह पुनर्विकासात संक्रमण शिबिरांच्या ६५ इमारतींसह ३० वर्षे झालेल्या म्हाडा इमारतींचा समावेश असेल. या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिराच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या विक्री घटकातील सहा इमारतींपैकी दोन इमारती विक्री घटकाऐवजी आता २६५ शिबिरार्थ्यांसाठी बांधल्या जातील
– अ वर्गवारीतील (मूळ रहिवासी) रहिवाशांना या इमारतीत कायमस्वरूपी मालकी हक्काची घरे दिली जाणार असून ब व क (खरेदी-विक्री व्यवहार केलेले) वर्गवारीतील शिबिरार्थिंना तात्पुरती घरे दिली जातील. ब व क संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
– अहिर यांच्या दालनातील बैठकीतील निर्णय लेखी स्वरूपात द्यावेत, त्यानंतरच आम्ही घरे रिकामी करून, अशी भूमिका सर्वपक्षीय शीव प्रतीक्षानगर कृती समितीने घेतली आहे. त्यानुसार तिथल्या तिथे पुनर्वसन करण्यासंबंधीचा निर्णय लेखी स्वरूपात कळविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
