मुंबई : मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, आदर्श नगरच्या धर्तीवर आता शीव, प्रतीक्षा नगर म्हाडा वसाहतीचाही समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. येथील जीर्ण संक्रमण शिबिरासह म्हाडा वसाहतीतील ३० वर्षे जुन्या इमारतींचा समावेश या पुनर्विकासात करण्यात येणार आहे. सध्या मुंबई मंडळ या पुनर्विकासाचा व्यवहार्यता अभ्यास करीत आहे. हा प्रकल्प व्यवहार्य ठरल्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपानुसार पुनर्विकास करायचा की इतर पर्याय स्वीकारायचा, याचाही व्यवहार्यता अभ्यासात केला जाणार आहे.
रखडलेल्या म्हाडा वसाहतींसह जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी म्हाडाने मुंबईतील ९०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील म्हाडा वसाहतींचा आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ प्रकल्पांद्वारे अंदाजे ७५ हजार रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, आदर्श नगर, कामाठीपुरा, गोराई, बोरिवली आदी वसाहतींचा यात समावेश आहे. आता यात आणखी एका प्रकल्पाची भर पडणार आहे. मुंबई मंडळाने प्रतीक्षा नगरचाही समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
प्रतीक्षा नगर अभिन्यासातील जुन्या-जीर्ण संक्रमण शिबिराचा तसेच येथील ३० वर्षांहून अधिक जुन्या म्हाडा वसाहतींचा या पुनर्विकासात समावेश असणार आहे. त्यानुसार ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारती कोणत्या आणि किती, याचा अभ्यास व्यवहार्यता तपासणीअंतर्गत केला जाणार आहे. हा पुनर्विकास सी अँड डी प्रारूपानुसार करायचा की बीडीडीप्रमाणे कंत्राटदार नियुक्त करायचा, याचाही अभ्यास यात केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पाची व्यवहार्यता सिद्ध झाल्यानंतर पुनर्विकासासंबंधीचा अंतिम निर्णय घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
प्रतीक्षा नगरमध्ये अंदाजे २ लाख ८० हजार चौ. मीटर इतके क्षेत्र आहे. यातील ५० टक्के क्षेत्र, म्हणजे अंदाजे एक लाख ३० हजार चौ. मीटर क्षेत्र संक्रमण शिबिराने व्यापले आहे. या क्षेत्रावर अंदाजे ६००० संक्रमण शिबिराचे गाळे आहेत. संक्रमण शिबिराच्या या क्षेत्राचा पुनर्विकास होणार आहेच, पण यात किती जुन्या म्हाडा वसाहती समाविष्ट होतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, हा पुनर्विकास मार्गी लागल्यास मुंबई मंडळाला संक्रमण शिबिराचे नवीन गाळे, सोडतीसाठी अतिरिक्त घरेही उपलब्ध होणार आहेत. मात्र, याबाबतची स्पष्टता व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर अभ्यासानंतरच येईल.
दरम्यान, याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, वरिष्ठ स्तरावर अभ्यासाला सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
