टेलिव्हिजन अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास गरज पडल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्याची तयारी राज्य सरकारकडून दाखविण्यात आली आहे. प्रत्युषाच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तशाप्रकारची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत राज्य सरकारने गरज पडल्यास याप्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्याची तयारी दाखविली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. तपासात कोणतीही हयगय किंवा पोलिसांना याप्रकरणाचा छडा लावण्यात अपयश आल्यास पोलीस प्रशासनाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप असलेल्या राहुल राज सिंह याची गुरुवारी तब्बल दोन तास चौकशी झाली होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी राहुलवर १५० प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, आपण प्रत्युषाचा छळ केला नसल्याचा दावा त्याने केला. उच्च न्यायालयाने राहुल राज सिंह याला १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.