मुंबई : ‘बालिका वधू’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या २०१६ सालच्या आत्महत्या प्रकरणातून तिचा कथित प्रियकर राहुल राज याला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दोषमुक्त केले. राहुल याच्यावर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता.

राहुल आणि प्रत्युषा यांच्यातील शेवटच्या संभाषणानुसार, राहुल हा ते राहत असलेल्या अपार्टमेंटकडे येत असताना तिला कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याबाबत समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे, त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा युक्तिवाद राहुल याच्या वकिलांनी त्याला दोषमुक्त करण्याची मागणी करताना केला होता. हा युक्तिवाद न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने मान्य केला आणि राहुल याला प्रकरणातून दोषमुक्त केले.

प्रत्युषा आणि राहुल यांच्या अखेरच्या संभाषणातून, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी प्रत्युषाने तिच्या पालकांसह सर्वांनाच जबाबदार धरले होते. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी तिने लिहून ठेवली नव्हती. त्यामुळे, राहुलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यातील घाईवरही न्यायालयाने बोट ठेवले. तसेच, त्याच्याविरुद्ध खटला चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे निरीक्षण त्याला दिलासा देताना नोंदवले.

प्रकरण काय ?

प्रत्युषा हिने १ एप्रिल २०१६ रोजी गोरेगाव येथील भाड्याच्या घरात आत्महत्या केली होती. त्यावेळी, तिचा प्रियकर राहुल याच्यावर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि जुलै २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. पोलिसांनी २०१८ मध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर राहुल याने सत्र न्यायालयात दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.