मुंबई : सरसकट कर्जमाफीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेते आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांची आज, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता प्रवीण सिंह परदेशी यांनी बैठक बोलावली होती. प्रत्यक्षात विरोधी पक्षातील नेते आणि शेतकरी संघटनेचे नेते ‘मित्रा’मध्ये पोहोचले पण, ऐनवेळी प्रवीणसिंह परदेशी यांनी बैठकीला येण्याचे टाळले. त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफीच्या बैठकीतून पळ काढला, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर काही आमदारांसह मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेऊन चर्चा करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार मागील आठवड्यात रोहित पवार, कैलास पाटील आदींनी परदेशी यांची भेट घेऊन बैठकीसाठी वेळ मागितली होती. त्यावेळी प्रवीणसिंह परदेशी यांनी आज, बुधवारी साडेदहा वाजता बैठकीची वेळ दिली होती. त्यानुसार आमदार रोहित पवार, काँग्रेसनचे सतेज पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, किसान संघटनेचे अजित नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप शिरसाट आदी नेते ‘मित्रा’मध्ये उपस्थित राहिले होते. पण, ऐनवेळी प्रवीणसिंह परदेशी यांनी बैठकीला येण्याचे टाळले, त्यामुळे रोहित पवार आणि अन्य नेत्यांनी सरकारने सरसकट कर्जमाफीच्या चर्चेतून पळ काढला अशी टीका केली आहे.

सरकार लबाड आणि ढोंगी

हे सरकार किती लबाड, ढोंगी, दांभिक आणि विश्वासघातकी आहे. हे आज पुन्हा सिद्ध झाले. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात नेमलेल्या समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसंदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ठरल्यानुसार नेते मंडळींच्या शिष्टमंडळासमवेत आम्ही सर्वजण वेळेत उपस्थित होतो, परंतु या बैठकीसाठी एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिला नाही आणि आयत्या वेळी बैठक रद्द झाल्याचे फोनवर सांगण्यात आले. हे अत्यंत संतापजनक आहे. सरकारच्या आदेशाशिवाय कोणताही अधिकारी अशी हिंमत करणार नाही. हा केवळ आमच्या शिष्टमंडळाचा अवमान नाही तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांची सरकारने चालवलेली ही घोर थट्टा आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे.