मुंबई : विकासकांकडून सतत होणाऱ्या फसवणुकीवर उपाय म्हणून स्वयंपुनर्विकासाचा उत्तम पर्याय आहे व त्यासाठी अर्थसहाय्याची अडचण मुंबै बँकेच्या माध्यमातून दूर करणारे महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ दिग्गज नेते शरद पवार यांनी स्वयंपुनर्विकासाबाबत स्वत:हून माहिती करुन घेतली. याबाबत पवार प्रचंड उत्सुक होते. स्वयंपुनर्विकास संकल्पना ही अतिशय चांगली असून यामधून मोठ्या शहरांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.

एका कार्यक्रमात पवार यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वयंपुनर्विकासाबाबत अधिक माहिती हवी असल्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी आपली वेळ घेऊन संपूर्ण माहिती देतो, असे दरेकर यांनी त्यांना सांगितले होते. त्यानंतर या विषयाबाबत पवार यांनी तात्काळ भेटीची वेळही दिली. आपण स्वत: तसेच विधान परिषद सदस्य प्रसाद लाड आणि स्वयंपुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पवार यांनी भेट घेतली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. त्यांनीही स्वयंपुनर्विकासाबाबत संपूर्ण माहिती करुन घेतली. याबाबत केंद्र सरकारकडून काय अपेक्षित आहे, याचीही विचारणा केली. स्वयंपुनर्विकास म्हणजे नेमके काय ते त्यातील अडचणी पवार यांनी समजावून घेतल्या. अनेक प्रश्न त्यांनी विचारले. मात्र स्वयंपुनर्विकासाबाबत त्यांनी संपूर्ण माहिती करुन घेऊन समर्थन केले, असे दरेकर यांनी सांगितले.

स्वयंपुनर्विकास प्रत्यक्षात कसा शक्य आहे, त्यासाठी अर्थसहाय्य कसे उपलब्ध होऊ शकते, याची माहिती दरेकर यांनी पवार यांना समजावून सांगितली. या प्रकल्पात अर्थसहाय्याचा प्रश्न दूर करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबै बँकेने अर्थसहाय्य केलेल्या मुंबईतील १७ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी सात प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाले आहेत. काही प्रकल्पात रहिवाशांनी आर्थिक भार स्वत: उचलला आहे तर काही प्रकल्पात मुंबै बँकेने कर्ज दिले आहे. अशा प्रकल्पांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत, असेही निदर्शनास आणण्यात आले.

या भेटीत दरेकर यांनी आतापर्यंत पूर्ण झालेले १६ स्वयंपुनर्विकास प्रकल्प, शासनाने दिलेल्या सवलती, निधीची उभारणी, सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून मिळणारा प्रतिसाद, परवडणाऱ्या घरांची निर्मिती, दरेकर समितीने तयार केलेला अहवाल, शासनाने स्थापन केलेले समूह/स्वयंपुनर्विकास प्राधिकरण, स्वयंपुनर्विकास प्रकल्पातील अडचणी याबाबतची सविस्तर माहिती शरद पवार यांच्यासमोर सादर केली. या योजनेसाठी मोठा निधी उभारावा लागेल, आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि इतर मोठ्या महामंडळांकडून निधी उभारणीसाठी मी स्वत: प्रयत्न करीन, त्यासाठी दिल्लीत बैठकही घेऊ, असा शब्दही पवार यांनी या भेटीत दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.