राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन क्रूझ ड्रग्ज तपास प्रकरणी एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर गंभीर आरोप लावले. यामध्ये “भाजयुमोचे मोहित भारती यांचा मेहुणा देखील सापडला होता, मात्र, त्याला सोडून देण्यात आलं. त्यामुळे हे सर्व षडयंत्र आहे”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपांना आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांनी उलट नवाब मलिक यांनाच प्रतिप्रश्न केला आहे.

“नवाब मलिकांनी आरोप केले आहेत. मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस तुमच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे कॉल रेकॉर्ड तपासणं, इतर माहिती घेणं हे आपल्याला सोपं आहे. नार्कोटिक्स विभागाकडे आपण ती माहिती देऊ शकता. किंबहुना पोलिसांकडूनच काही माहिती मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांचा केलि

“याच माहितीतून तीर मारण्याचा केविलवाणा प्रयत्न नवाब मलिक यांचा आहे. भाजपावर दोषारोप करताना भाजपा नेत्याच्या मेहुण्यावर आरोप होत आहेत. ते अजून सिद्ध व्हायचे आहेत. पण नवाब मलिक यांच्या जावयाला थेट एनसीबीनं अटकच केली आहे. मग याचा दोष आम्ही सासरे नवाब मलिक यांना द्यायचा का? त्यांना दोषी धरायचं का? मोहीत कंबोज यांच्या नावाने भाजपाला जबाबदार धरता, मग आपल्या जावयाच्या संदर्भात आम्ही पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरायचं का? याचं उत्तर नवाब मलिक यांनी द्यावं”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न

दरम्यान, प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. “एक तरुण पिढी बरबाद होऊ शकते. त्याला चाप बसण्यासाठी कारवाई महत्त्वाची असताना कुणालातरी वाचवण्यासाठी सनसनाटी निर्माण करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न आहे”, असं ते म्हणाले. “एजन्सीवर विश्वास नाही असं ते म्हणतात. जर तसं असेल, तर ते दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. एजन्सीवर विश्वास नाही, न्यायालयावर विश्वास नाही असं म्हणतात. जनतेच्या न्यायालयावर विश्वास आहे असं म्हणतात. त्यामुळे समजून उमजून रोज सनसनाटी आरोप करायचे आणि संबंधितांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याची भूमिका त्यांची आहे”, असं देखील प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.

Cruise Drug Case: नवाब मलिकांनी जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव, म्हणाले…

नवाब मलिक यांना जास्त ज्ञान असेल तर..

“नवाब मलिकांना जास्त ज्ञान असेल, कायद्याची माहिती असेल, तर मला वाटतं कायद्यापेक्षा ते मोठे आहेत. त्यांनी तेच ज्ञान आणि तीच माहिती कायद्याच्या चौकटीत संबंधितांना द्यावी आणि त्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी न्याय मिळवून घ्यावा”, असं देखील ते म्हणाले.