लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहूना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. आता खुद्द प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे.

प्रवीण तरडे यांनी वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद २’ चित्रपटाचे डिजिटल पोस्टर नुकतेच समाज माध्यमांवर प्रदर्शित केले. हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेल्या ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ या पाचही चित्रपटांना तिकिट खिडकीवर दमदार कामगिरी केली आहे. आता त्यांच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटालाही तसाच प्रतिसाद मिळणार का याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. ‘देऊळ बंद २’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘आता परीक्षा देवाची’ असे उपशीर्षकही असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच, चित्रपटात कोण कोण कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत? हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने ते जाणण्यासाठी रसिकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

Award Banner