Central Railway / मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – उत्तर प्रदेशातील प्रयागराज दरम्यान ४४ साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार या विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी ते १४ सप्टेंबरदरम्यान गाडी क्रमांक ०४१०२ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या २२ फेऱ्या धावतील. ही रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी दुपारी ४.५५ वाजता सुटेल आणि प्रयागराज येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीच्या १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी आणि ७ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत अतिरिक्त विशेष रेल्वेगाडी म्हणून ४ फेऱ्या धावतील. ३ ते ३१ मार्चदरम्यान होळी विशेष रेल्वेगाडी म्हणून ५ फेऱ्या धावतील. तर, २१ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान उन्हाळी विशेष रेल्वेगाडी म्हणून १३ फेऱ्या चालवण्यात येतील.
गाडी क्रमांक ०४१०१ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या १६ फेब्रुवारी ते १३ जुलैदरम्यान २२ फेऱ्या धावतील. ही रेल्वेगाडी प्रयागराज येथून दर सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता पोहोचेल. १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी आणि ६ एप्रिल ते १३ एप्रिलदरम्यान अतिरिक्त रेल्वेगाडी म्हणून ४ फेऱ्या चालवण्यात येतील. २ ते ३० मार्चदरम्यान होळी विशेष रेल्वेगाडी म्हणून ५ फेऱ्या चालवण्यात येतील. तर, २० एप्रिल ते १३ जुलैपर्यंत उन्हाळी विशेष रेल्वेगाडी म्हणून १३ फेऱ्या चालवण्यात येतील.
या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी (फक्त गाडी क्रमांक ०४१०२ साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर येथे थांबा देण्यात येईल. या रेल्वेगाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे डबे, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे, ९ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ द्वितीय आसन, सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी रेल्वे डब्यांची संरचना असेल.
या विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण १४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आगाऊ आरक्षण कालावधी अंतर्गत प्रवासासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच आगाऊ आरक्षण कालावधीच्या नंतरच्या प्रवासाचे तिकीट आरक्षण हे त्यानंतरच्या आगाऊ आरक्षण कालावधीच्या तारखांना सुरू होईल. सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांसाठी आरक्षण यूटीएसद्वारे करता येईल. तसेच रेलवन ॲपवरूनही तिकीट काढता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
