मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी केल्या जाणाऱ्या नालेसफाईला गेल्या आठवड्यापासून सुरूवात झाली आहे. यावर्षी पावसाळ्याआधी ७० टक्क्यांऐवजी ८० टक्के गाळ काढला जाणार आहे. तसेच नालेसफाईतून किती गाळ काढला त्याची वेळोवेळी माहिती देणारी यंत्रणा (डॅशबोर्ड) यंदाही कार्यान्वित केली जाणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील छोटे नाले, मोठे नाले, नद्या, रस्त्याच्या कडेला असलेली भूमिगत गटारे यामधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के पावसाळ्यादरम्यान, तर १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. यावर्षी मात्र पावसाळ्याआधी ८० टक्के गाळ काढला जाणार आहे. १० टक्के गाळ पावसाळ्यात व १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जाणार आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नाल्यातील प्रवाह अधिक चांगला प्रवाहित राहील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नालेसफाईच्या कामात पारदर्शकता यावी याकरीता पालिकेने गेल्यावर्षीपासून नालेसफाईच्या कामांची रोजची प्रगती पाहता येईल अशी अद्ययावत यंत्रणा सुरू केली होती. कोणत्या नाल्यातून दिवसभरात किती गाळ काढला याची माहिती संकेतस्थळावर डॅशबोर्ड स्वरूपातून सर्वसामान्यांना मिळत होती. गेल्यावर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता व मुंबईत पाणी साचले नव्हते. त्यामुळे यंदाही पालिकेने अशीच यंत्रणा सुरू करण्याचे ठरवले आहे. करोना काळात रुग्णांची संख्या, खाटांची व्यवस्था याबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी जसा डॅशबोर्ड तयार करण्यात आला होता, तशीच अद्ययावत यंत्रणा पालिकेने नालेसफाईसाठी तयार केली आहे.
नालेसफाईच्या कामात अनेकदा घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. उद्दिष्टाइतका गाळच न काढणे, गाळात बांधकामाचा राडारोडा मिसळणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालिकेने गेल्यावर्षीपासून नालेसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी खास यंत्रणा उभारली आहे. गाळ वाहून नेणाऱ्या डंपरवर व्हिटीएस यंत्रणा जोडली जाणार आहे. ही यंत्रणा पालिकेच्या सर्व्हरला जोडली जाणार आहे. क्षेपणभूमीवर सीसीटीव्ही बसवणे, डंपर रिकामा करतानाचे चलतचित्र काढणे, रिकाम्या डंपरचे वजन करणे अशा अटी यावेळीही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रत्येक नागरिकाला आपल्या विभागामधील नाल्याची गाळ काढून स्वच्छता कशी केली जाते, ते सहजपणे मोबाईलद्वारे पाहता येईल. विभागातील विविध नाल्यांची तपशिलवार माहिती, प्रत्येक नाल्यामधून काढलेल्या व वाहून नेलेल्या गाळाचा तपशील, गाळ वाहून नेणाऱया प्रत्येक वाहनाचा छायाचित्रांसह तपशील आणि नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरु असतानाची छायाचित्रे / दृश्य चित्रफीत नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार व सुलभरित्या दररोज पाहता येणार आहे.