मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मोसमी सरींची नोंद झाली. त्यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण होऊन दिलासा मिळाला. दरम्यान, रविवारी शहरात उष्ण आणि दमट वातावरण असल्याने दिवसभर असह्य उकाडा कायम होता. तसेच तापमानाचा पाराही ३५ अंशांवर स्थिर होता. पुढील तीन दिवस शहरात पावसाची शक्यता असून सोमवारी आणि मंगळवारी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी २६ मे रोजी मोसमी पावसाचे आगमन होऊन मे महिन्यात मागील अनेक वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मागील काही वर्षाच्या तुलनेत मे महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात पूर्व मोसमी सरींचा तुरळक ठिकाणी केवळ शिडकावा वगळता पूर्व मोसमी सरींची नोंद झाली नाही. त्यामुळे मुंबईत यंदा मे महिना कोरडा आणि तापदायक ठरला. काही दिवसांपूर्वी मुलुंड, मानखुर्द तसेच वांद्रे परिसरात हलक्या सरींचा शिडकावा झाला होता.

दरम्यान, रविवारी सकाळी ६ ते ९ च्या सुमारास चेंबूर, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, वांद्रे, विक्रोळी, अंधेरी, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, पवई, दादर आणि मालाड भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वळवाच्या सरींनी हजेरी लावली. पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद चेंबूर येथे झाली. तेथे २७ मिमी पाऊस नोंदला गेला. तर मानखुर्द २२ मिमी, घाटकोपर ११ मिमी तर कुर्ला येथे १० मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरातील सर्वाधिक पावसाची नोंद वांद्रे कुर्ला संकुल ( २२ मिमी ) येथे झाली.

शहरात उकाडा कायम

दुपारनंतर मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३५. ८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सरासरी कमाल तापमानाहून १.७ अंश सेल्सिअसने अधिक नोंदले गेले. कुलाबा येथे २९ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे २६.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, शहरात सोमवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे आहे. शहरात सोमवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.