मुंबई : यंदा पावसाळय़ात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग जलमय होऊन प्रवाशांना फटका बसू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पावसाळापूर्व कामे हाती घेतली आहेत. रेल्वे मार्गावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारदरम्यान १४२, तर मध्य रेल्वेने उपनगरीय हद्दीत ११८ पाणी उपसा करणारे पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांसाठी मुंबई महापालिकेची मदत घेण्यात येणार आहे. दरम्यान, रेल्वे मार्गावरील नालेसफाईची कामे मेअखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर मशीद रोड, सॅन्डहस्र्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी ते करी रोड, परळ, दादर ते शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड व ठाणे, तसेच हार्बर मार्गावरील टिळकनगर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, गुरु तेज बहादूर नगर या ठिकाणी पाणी साचून रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. यंदा पावसाळय़ात रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल आणि मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळीत होऊ नये यासाठी रेल्वेने विविध कामे हाती घेतली आहेत. रुळांची उंची वाढविणे, रुळांखालून आणि त्याच्या बाजूने जाणाऱ्या नाल्यांच्या सफाईची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम रेल्वेनेही मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली असून चर्चगेट ते मरिन लाइन्स, मुंबई सेन्ट्रल ते ग्रॅन्ट रोड, प्रभादेवी ते दादर, दादर ते माहीम जंक्शन, माहीम ते वांद्रे, वांद्रे ते खार रोड, अंधेरी ते जोगेश्वरी, बोरिवली ते दहिसर, वसई रोड ते नालासोपारा, नालासोपारा ते विरार, विरार ते वैतरणा आणि वैतरणा ते सफाळे या पाणी साचणाऱ्या व संवेदनशील ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाखालीही पाणी साचत असल्याने या भागातील आणि अन्य पट्टय़ातील रुळांची उंची वाढवण्यात येत आहे.
पाणी साचणाऱ्या ठिकाणी जवळपास ४४ रेल्वेचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तर रेल्वे उड्डाणपुलाखाली व आसपास ८७ कर्मचारीही उपस्थित असणार आहेत. जर एखाद्या स्थानकादरम्यान रुळांवर साचलेले पाणी ७५ मिलिमीटपर्यंत गेल्यास लोकल गाडय़ांना प्रतितास ४० किलोमीटर, तर ७५ मिलिमीटर ते १०० मिलिमीटरवर पाणी पोहोचल्यास प्रतितास २५ मिलिमीटर वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाणी साचल्यास प्रतितास १० किलोमीटर वेगाने रेल्वे धावेल. परंतु पाणी साचू नये आणि साचल्यास त्याचा उपसा करण्यासाठी चर्चगेट ते विरार दरम्यान १४२ पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
सीएसएमटी-पनवेल स्थानकादरम्यान ३० पंप
नालेसफाईची ५५ कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी १२ कामे प्रगतिपथावर आहेत. तर सीएसएमटी ते कल्याण, वाशी, कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानच्या एकूण ६० किलोमीटर पट्टय़ातील रुळांची उंची वाढविण्यात येत आहे. मध्य रेल्वे पाणी उपसा करणारे ११८ पंप बसविणार असून यातील ५३ पंप हे सर्वाधिक संवेदनशील अशा रेल्वे स्थानक भागात बसविण्यात येणार आहेत. ११८ पैकी ३० पंप सीएसएमटी-पनवेल स्थानकादरम्यान बसविण्यात येणार आहेत.