सुहास जोशी

करोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आल्याने मोठय़ा सोहळ्याऐवजी रिसॉर्टमध्ये समारंभ करण्याचा कल वाढला आहे. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत रिसॉर्टमध्ये होणाऱ्या सोहळ्यांत ५० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे अनेक रिसॉर्टचालकांनी सांगितले.

करोनापूर्वकाळात रिसॉर्टमधील विवाहांचे प्रमाण हे एकूण सोहळ्यांच्या ३० टक्के असायचे. मात्र पुढील तीन महिन्यांसाठी या मागणीत दुप्पट वाढ झाल्याचे विवाह नियोजक (वेडिंग प्लानर) अमोल भगत यांनी सांगितले. शहरातील मंगल कार्यालयात बंदिस्त वातावरणात मोजक्याच उपस्थितीत होणाऱ्या खर्चामध्ये सध्या फक्त जेवणाच्या खर्चातच बचत होत आहे. त्या तुलनेत रिसॉर्टवरील खर्चामध्ये फार मोठा फरक पडत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

करोनामुळे एकूणच खर्चाची गणितेदेखील बदलली असून रिसॉर्टमधील लग्नाचा खर्च आवाक्यात येत असल्याचे काही विवाह नियोजकांनी सांगितले. अशा लग्नांचा अंदाजे खर्च तीन लाखांपासून सुरू होत असल्याचे त्यांनी नमूद केले. एरवी भव्यदिव्य सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकजवळील ‘सुला वाईनयार्ड’सारख्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे सोहळेदेखील येत्या काळात होत असल्याचे सुलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

शिथिलीकरणात शासनाने विवाह सोहळ्यास परवानगी दिल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत चार विवाह झाल्याचे, मुळशी येथील मल्हार माची रिसॉर्टचे रामदास मुरकुटे यांनी सांगितले. तर फेब्रुवारीपर्यंतच्या काळात १५ विवाहांची नोंदणी असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे विवाह नियोजकांपेक्षा थेट येणाऱ्यांची संख्या या काळात वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.

रिसॉर्टमध्ये तुलनेने मोठी जागा आणि मोकळीक असण्याचा फायदा मिळत असल्याने गेल्या महिनाभरात विवाह सोहळ्यांसाठीची मागणी वाढली असल्याचे, डय़ूक्स रिट्रिटचे व्यवस्थापक राकेश गुलेरिया यांनी सांगितले.

यावर्षी आमच्याकडील विवाह सोहळ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, ग्राहकांच्या गरजेनुसार खर्चाचे अंदाजपत्रक मांडले जात असल्याचे सुला वाईनयार्डचे उपाध्यक्ष मोनित ढवळे यांनी सांगितले. करोनामुळे करावे लागलेले बदल, शासनाचे नियम यामुळे खर्चात वाढ होत असली तरी त्याचा भार ग्राहकांवर पडत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सोहळ्यादरम्यान गर्दीवर पूर्ण नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यमवर्गाचाही कल..

करोनापूर्वकाळात रिसॉर्टमधील विवाह सोहळ्यांचे प्रमाण उच्चभ्रू आणि उच्च मध्यम वर्गात अधिक असायचे. पण आता मर्यादित स्वरूपातच सोहळा करायचा तर थोडा अधिक खर्च करून विवाह आणखी संस्मरणीय करावा अशी भावना मध्यमवर्गीयांमध्येदेखील दिसत आहे. यामध्ये शहराबाहेरील नजीकच्या रिसॉर्टवर जाण्याकडे कल वाढत असल्याचे अमोल भगत यांनी सांगितले. एरवी कृषी पर्यटन केंद्रांचा यामध्ये विचार व्हायचा नाही, पण येत्या काळात कृषी पर्यटन केंद्रांनादेखील मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्नाची नासाडी कमी..

करोनामुळे मर्यादित स्वरूपात लग्न करता येऊ शकते याची जाणीव झाली आहे. एरवी गर्दी असल्यामुळे खूप पदार्थ एकाच वेळी ताटात घेतले जायचे. पण सध्या मर्यादित उपस्थितीमुळे आणि वाढण्यास कर्मचारी असल्याने अन्न वाया जाण्याचे प्रमाण खूपच नियंत्रणात आल्याचे मल्हार माची रिसॉर्टचे रामदास मुरकुटे यांनी सांगितले.

नोंदणीचित्र.. चातुर्मासामुळे विवाह सोहळ्यांची संख्या कमी होती. चातुर्मास संपल्यावर आणि तुळशी विवाहानंतर २७ नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे. १६ फेब्रुवारी २०२१पर्यंत या मोसमात मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातील रिसॉर्टमध्ये विवाह सोहळ्यांना दरवर्षीपेक्षा मागणी वाढली आहे.