निशांत सरवणकर

मुंबई : भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर असताना महत्त्वाच्या पदावर असलेल्या अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सत्ताबदल झाल्यानंतर कमी महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले गेले. यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचा रोष टाळण्यासाठी अखेरीस केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.

मुंबई पोलीस दलात गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त, महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त महासंचालक पद भूषविणाऱ्या अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यावर राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाची व त्यानंतर सुधार सेवा व कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालकपद या त्या मानाने कमी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी अखेरीस केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले. ते आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

 सत्ताबदल झाला तेव्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोध जैस्वाल होते. सत्ताधाऱ्यांशी त्यांचे सूत जमले नाही. सध्या तुरुंगात असलेले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली बदल्यांची यादी जशीच्या तशी मान्य करण्यास जैस्वाल यांनी नकार दिला होता. तेव्हाच त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याची तयारी केली होती.

आज ते केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख असले तरी राज्यातून त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती घेतली तेव्हा ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक होते. त्यापाठोपाठ राज्याच्या गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी प्रतिनियुक्तीचा मार्ग धरला. फोन टॅपिंग प्रकरणात श्रीमती शुक्ला अडकल्या आहेत. त्यांची नियुक्ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या हैदराबाद युनिटच्या अतिरिक्त महासंचालकपदी झाली. राज्याच्या महासंचालकपदाच्या शर्यतीत त्या होत्या. परंतु सत्ताबदल झाल्याने त्यांना राज्यातून जावे लागले. 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनीही या सरकारने नियुक्त केलेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागात रुजू करून घेण्यास विरोध केला होता. सरकारशी संघर्ष करण्याऐवजी त्यांनीही केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले. तेही आता राष्ट्रीय तपास यंत्रणेत सक्रिय आहेत.

भाजप सरकारच्या काळात महत्त्वाची पदे भुषविलेले अनेक अधिकारी आज महाविकास आघाडी सरकारपासून वाचण्यासाठी प्रतिनियुक्तीचा मार्ग अवलंबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे खास अधिकारी मानले जाणारे एक अतिवरिष्ठ अधिकारीही केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. नवल बजाज, मनोज शर्मा, राजेश प्रधान, एस. चैतन्य, धनंजय कुलकर्णी यांच्यासह काही पोलीस निरीक्षकही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात प्रतिनियुक्तीवर गेले आहेत.