मुंबई: वाढलेला उकाडा आणि तिकीट दरातील कपातीमुळे मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. वाढत्या प्रतिसादामुळे सीएसएमटी आणि डोंबिवली स्थानकातून सर्वाधिक तिकीट आणि पासविक्री होत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ५ मेपासून तिकीट दरात कपात करण्यात आली तेव्हापासून १५ मेपर्यंत सीएसएमटीतून एकूण ८,१७१, डोंबिवली स्थानकांतून ७,५३४, कल्याण स्थानकातून ६,१४८, ठाणे स्थानकात ५,८८७ आणि घाटकोपर स्थानकात ३,६९८ तिकीट व पासची विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या फेब्रुवारी २०२२ मध्ये सरासरी ५,९३९ प्रवाशांवरून मे २०२२ मध्ये सरासरी २६,८१५ प्रवासी इतकी झाली आहे. ४ एप्रिल २०२२ ला प्रवाशांची संख्या ५१ हजार ९४४ होती. त्यात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.

सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ मार्गावर १४ मेपासून १२ वातानुकूलित सेवा वाढल्याने मेन लाइनवरील एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ झाली आहे. आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलला पसंती देऊ लागले आहेत. मध्य रेल्वेने रविवारी आणि नामनिर्देशित सुट्टीच्या दिवशीही १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्यास सुरुवात केली आहे. त्यालाही प्रतिसाद मिळत आहे.

परवडणारे शुल्क

शहर आणि उपनगरातील वातानुकूलित टॅक्सीऐवजी वातानुकूलित लोकलचा प्रवास सर्वात किफायतशीर असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.  ५ मेपासून एकेरी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढत आहे. सीएसएमटी ते ठाणे या ३४ किलोमीटर अंतरासाठी एका प्रवासाचे भाडे ९५ रुपये आहे आणि सीएसएमटी ते कल्याण ५४ किलोमीटर अंतरासाठी १०५ रुपये आहे.  हे भाडे मोबाइल अ‍ॅप आधारित वातानुकूलित टॅक्सीपेक्षा कमी आहे. टॅक्सीने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते कल्याण अनुक्रमे ५२६ आणि ८३१ रुपये भाडे आकारण्यात येत आहे.