मुंबई : तरुण व्यावसायिक व नोकरदारांमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी चारचाकी वा विमानाऐवजी प्रीमियम बसला मोठी पसंती मिळत आहे. आराम, डिजिटल सुविधा व स्वत: गाडी चालविण्याच्या तणावापासून दूर राहणारे ७० टक्के तरुणांचा यात समावेश आहे.
देशभरातील १३,३२० नागरिकांनी सहभाग नोंदविलेल्या ‘इंट्रसिटी स्मार्टबस इंटरसिटी मोबिलिटी सर्व्हे २०२६’ नुसार, देशात आंतरशहरी प्रवासाच्या स्वरूपात बदल होत आहे. सर्वेक्षणात, जवळपास तीन-चतुर्थांश (७४.३टक्के) प्रवासी १८ ते ४३ वर्षे वयोगटातील, तर ६५.९ टक्के पगारदार व्यावसायिक आहेत.
देशातील सर्वात सक्रिय प्रवासी संघटित व तंत्रज्ञान-सक्षम वाहतुकीला प्रतिसाद देत असल्याचे दिसून येते. निम्म्याहून अधिक जणांकडे स्वतःचे वाहन आहे. तरीही ३०.४ टक्के लोक आंतरशहरी प्रवासासाठी स्वतःचे वाहन चालवण्यास प्राधान्य देत नाहीत. ४००-६०० किमीच्या प्रवासासाठी खर्च सारखाच असल्यास वाहतुकीचे साधन निवडण्यास सांगितले असता, दहापैकी जवळपास सात जणांनी (६९.६ टक्के) स्वतःची चारचाकी, रेल्वे वा विमानाऐवजी प्रीमियम शेअर्ड अर्थात सार्वजनिक बसला पसंती दिली.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
– पाचपैकी चार जणांनी (८२.४ टक्के) प्रवासासाठी तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ऑनलाइन बस तिकीट बुकिंग, सुलभ डिजिटल उपलब्धता (४२.५ टक्के), आरामासह बसमधील सुविधा (४३ टक्के) व लांब पल्ल्यासाठी खासगी वाहनातील ताण टाळणे (४०.५ टक्के) ही प्रमुख कारणे आहेत.
– प्रवासात सुरक्षितता हा सर्वात प्रभावी घटक ठरतो. सामायिक वाहतूक सेवा निवडताना परवडण्याजोगा खर्च (४२.५ टक्के) व आराम व स्वच्छता (४०.५ टक्के) या बाबींसह सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा विचार (४३ टक्के) अग्रस्थानी आहे.
– ३३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत संघटित वाहनचालकांनी प्रवासी सुरक्षितता व सेवा गुणवत्तेवर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित केली.
दर्जेदार सुविधांसाठी खर्चाची तयारी
सामायिक वाहतूक केवळ एक किफायतशीर पर्याय न राहता, प्रवासाचा एक पसंतीचा प्रकार आहे. सर्वेक्षणात मत नोंदविलेल्या जवळजवळ निम्म्या (४९.२ टक्के) नागरिकांनी गेल्या काही महिन्यातील प्रवास बस व रेल्वेद्वारे केला आहे. ७६.३ टक्के जणांनी येत्या तीन वर्षांत शेअर्ड मोबिलिटीचा वापर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केल्याने सार्वजनिक वाहतुकीकडे वाढता कल अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. सुमारे ७१ टक्के प्रवाशांनी चांगल्या दर्जाच्या सुविधांसाठी अधिक पैसे मोजण्याची तयारी दर्शवली आहे.
