scorecardresearch

दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
(सांकेतिक छायाचित्र)

मुंबई : शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र उभय गटांचे परगावातील शिवसैनिक विरोधकांच्या मेळाव्यात हजेरी लावू नयेत यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानावर असून तेथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे दर्शन घेण्याचे निमित्त करून बंडखोर गटाने मुंबईत आणलेले शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने परगावातून येणारी वाहने शिवाजी पार्कपासून दूरवर उभी करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे समजते. तसेच ठाकरे गटाचे शिवसैनिकही एमएमआरडीएच्या दिशेने फिरकू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 उभय गटांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील शिवसैनिकांना मेळाव्यासाठी मुंबईत आणण्याची मोहीमच हाती आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिकांना एमएमआरडीए मैदानावर आणण्याची योजना शिंदे गटाने आखली आहे. गावागावांतून मोठय़ा संख्येने बसमधून शिवसैनिकांना आणण्याची शिंदे गटाची योजना आहे.

 प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. मुंबईबाहेरून येणारी शिंदे गटाची वाहने मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल, वांद्रे – कुर्ला संकुलातील मोकळी जागा, सोमय्या मैदानावर उभी करण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. कोणत्या जिल्ह्यातील वाहने कुठे उभी करायची याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येणार आहेत. सोमय्या मैदानापासून मेळाव्याचे ठिकाण दूर आहे. त्यामुळे कदाचित सोमय्या मैदानाऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याचा विचारही सुरू आहे. तथापि, उशिरा येणारी वाहने सोमय्या मैदानावर उभी करावी लागणार आहेत.

पावसाचे सावट.. 

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बुधवारी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली, तर मैदान सुकण्यास वेळ मिळेल. नाही तर काय करायचे, याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे आपल्या मेळाव्यांबाबत निर्णय घेतील, असे दोन्ही गटांमधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

 गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पाऊस पडत असून पुढील चार दिवसांतही तो पडण्याचा अंदाज आहे. पावसामुळे शिवाजी पार्क आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानांवर चिखल झाला आहे.  दोन्ही गटांनी मेळाव्यांसाठी जोरदार तयारी करून राज्यभरातील कार्यकर्त्यांना पाचारण केले जाणार आहे. हे कार्यकर्ते बसगाडय़ा, खासगी वाहनांमधून येणार असून मैदानांमध्ये चिखलात पार्किंग करणे मुश्कील होईल. तेथेच त्यांचे दुपारचे भोजन, चहा आणि शौचालयासाठी अन्य व्यवस्था करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे पाऊस थांबण्याची दोन्ही गटांमधील नेत्यांना प्रतीक्षा आहे. अन्यथा मैदानाऐवजी बंदिस्त सभागृहात मेळावा घ्यायचा की काय करायचे, याचा विचार करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठ संकुलातील मैदानांवर वाहने उभी करण्यास विरोध

मुंबई : शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यासाठी येणाऱ्यांची वाहने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानात उभी करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, छात्र भारती आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.  राज्यातून ठिकठिकाणांहून मेळाव्यासाठी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते बसेसमधून मुंबईत दाखल होतील, असा दावा शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे. या बसगाडय़ा उभ्या करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील काही मोकळय़ा मैदानांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने या मैदानांची साफसफाई करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्याला विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण अस्तित्वात नसताना शिंदे गटाला वाहनतळासाठी मैदाने देण्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी करावी. भविष्यात अन्य राजकीय पक्ष आपापल्या कार्यक्रमांसाठी मैदानांची मागणी करतील. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे संकुल राजकीय अड्डा बनेल. त्यामुळे त्वरित ही परवानगी रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवून केली आहे.  सध्या मुंबई विद्यापीठात प्रभारी अधिकारी कार्यरत असल्यामुळे सर्वच विभागांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. आजवर विद्यापीठाच्या संकुलात कोणतेही राजकीय कार्यक्रम झाले नव्हते, पण आता शिंदे – फडणवीस सरकारच्या दबावामुळे मुंबई विद्यापीठाने ही मैदाने राजकीय वापरासाठी दिली आहेतह्ण, असा आरोप युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे. परवानगी रद्द करण्यात आली नाही, तर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून एकही गाडी आत जाऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या