लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अधिक गतीने कामे करताना गुणवत्तापूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. दिवसाऐवजी रात्रीचे तापमान कमी असते. त्यामुळे काँक्रिटीकरणाची कामे रात्री केली जात आहेत. त्यामुळे दुय्यम अभियंता, सहायक अभियंत्यांनी रात्रीच्या वेळी प्रकल्पस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे आदेशही बांगर यांनी दिले आहेत.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. सध्या सुरू असलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच त्यांचा दर्जा राखण्याचे आव्हानही मुंबई महापालिकेच्या यंत्रणे पुढे आहे. रस्ते कामांची अत्युच्च गुणवत्ता राखताना कामांमध्ये येणारी आव्हाने, अभियंत्यांच्या शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची विचारमंथन कार्यशाळा पवई येथील मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) येथे गुरुवारी पार पडली. त्यावेळी बांगर यांनी वरील आदेश दिले.
हाती घेतलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे ३१ मेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अधिक गतीने करण्यात येणार आहेत. या कामांचा दर्जा राखण्यासाठी आयआयटीचे पथक आणि पालिकेचे अधिकारी कामांची पाहणी करीत असतात. या पाहणीदरम्यान आढळलेल्या आव्हानांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना त्यामध्ये गुणवत्तेबाबत आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे असते, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले.
आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्राध्यापक डॉ. के. व्ही. कृष्णराव, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख टॉम मॅथ्यू, अधीक्षक प्राध्यापक पी. वेदगिरी, सहायक प्राध्यापक सोलोमन डिब्बार्म,महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम आदी यावेळी उपस्थित होते. महानगरपालिका अभियंते तसेच गुणवत्ता तपासणी संस्था, कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी असे एकूण ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.