Maharashtra Rain Updates : मुंबईत दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दमदार हजेरी लावली असून सकाळी कार्यालयात निघालेल्या अनेकांची तारांबळ उडाली. मात्र दडी मारलेल्या पावसाच्या हजेरीने मुंबईकर सुखावले. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी संततधार तर, काही ठिकाणी अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे ४१.४ मिमी, तर कुलाबा येथे ३३.२ मिमी पावसाची नोंद झाली. कोकणातही पाऊसधारा बरसू लागल्या असून शेतकऱ्यांचे चेहरे उजळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जूनच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. मुंबई, पालघर या भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. तर, उर्वरित राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊसधारा कोसळल्या.

जाणून घ्या कुठे किती पावसाची नोंद झाली –

मागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर २२ मिमी, शहापूर 6 मिमी, ठाणे ६८, मुरबाड ८ मिमी, भिवंडी २३ मिमी, कल्याण ४८ मिमी पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये ३६ मिमी, म्हसळा ९५ मिमी, माणगाव ६४ मिमी, उरण ७० मिमी, श्रीवर्धन १४४ मिमी, खालापूर १६ मिमी, रोहा ३७ मिमी, पोलादपूर ३५ मिमी, मुरुड ९६ मिमी, सुधागड ८० मिमी, तळा १४६ मिमी, पनवेल ७.६ मिमी, माथेरान ४४.४ मिमी, अलिबाग १३१ मिमी, महाड ३० मिमी पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुधमार्ग ३९ मिमी, कणकवली ८२ मिमी, मालवण ११२ मिमी, मुळदे ५७.२ मिमी, देवगड १८४ मिमी, वैभववाडी ७३ मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड १६ मिमी, लांजा १४५ मिमी, चिपळूण ६८ मिमी, देवरुख ४१ मिमी, राजापूर ६५ मिमी, मंडणगड ४७ मिमी, दापोली ४९ मिमी, गुहागर ३३ मिमी, वाकवली २४ मिमी पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यातील तलासरी २०.१ मिमी, वाडा ८ मिमी, विक्रमगड ३० मिमी, पालघर ३१.४ मिमी, वसई ४१ मिमी, जव्हार १८ मिमी पावसाची नोंद झाली.

राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज –

हवामान खात्याने ३० जून रोजी राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’चा (सतर्क असावे) इशारा दिला आहे. तर, ठाणे, मुंबई, रायगडसह विदर्भात ‘यलो अलर्ट’चा (लक्ष असावे) इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presence of heavy rains in mumbai konkan mumbai print news msr
First published on: 30-06-2022 at 11:12 IST