वरळीतील १०० वष्रे जुन्या चाळीतील १६ हजार चौरस फुटांचा वापर; दुरुस्ती करून संग्रहालयात रूपांतर

मुंबई : बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली असून हळूहळू एक एक ऐतिहासिक चाळ पाडली जाणार आहे. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील १९४ चाळी जमीनदोस्त होणार आहेत. मात्र त्याचवेळी वरळीतील एक चाळ मात्र १०० वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत तशीच उभी राहणार आहे. बीडीडी चाळी कशा होत्या, या चाळीचा इतिहास काय हे पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचत राहावे आणि चाळीचे अस्तित्व कायम राहावे यासाठी एका चाळीचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे.

बीडीडी चाळींचा इतिहास, या चाळी कशा होत्या, त्यातील घरे कशी होती, चाळींचे ऐतिहासिक-सांस्कृतिक महत्त्व काय हे सर्व या संग्रहालयाच्या माध्यमातून मांडले जाणार आहे. वरळीतील एका चाळीचे वरचे दोन मजले पाडून एकमजली चाळ या संग्रहालयासाठी जशीच्या तशी ठेवली जाणार आहे. या चाळीची आवश्यक दुरुस्ती करून तिचे संग्रहालयात रूपांतर केले जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जवळपास १६ हजार चौ. फूट जागेचा वापर संग्रहालय म्हणून केला जाणार आहे. ही चाळ नेमकी कोणती असेल हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात हे काम केले जाणार असल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. वरळी बीडीडी चाळीचे कंत्राटदार टाटा हाऊसिंगकडून हे संग्रहालय तयार केले जाणार आहे.

चाळींचा इतिहास

ब्रिटिशांनी १९२२-२३ मध्ये वरळी, शिवडी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे ९३ एकरावर २०७ चाळी बांधल्या. कैद्यांना डांबण्यासाठी या चाळी बांधण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्य लढय़ातील लोकांनाही येथे डांबले जात होते. पुढे मात्र या चाळी रिकाम्या पडून होत्या. या पडून असलेल्या इमारतीत हळूहळू गिरणी कामगार, कष्टकरी मजूर येऊन राहू लागले. ब्रिटिश त्यांच्याकडून भाडे वसूल करायचे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अर्थात बीडीडी मंडळ स्थापन करत या चाळींची देखभाल केली जाऊ लागली. काही वर्षांनी ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली. आता या चाळी जुन्या झाल्याने मोडकळीस आल्याने या चाळींचा पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. या चाळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, आचार्य अत्रे अशा अनेकांचे काही काळ वास्तव्य होते. स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अनेक चळवळी, घडामोडींच्या या चाळी साक्षीदार आहेत.