scorecardresearch

मुंबई : राज्यातील ८४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी तर ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

मुंबई : राज्यातील ८४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक
संग्रहित छायाचित्र

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली. राज्यातील एकूण ८४ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. यापैकी ४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी सन्मानीत करण्यात येणार आहे.

राज्यातील तीन अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येणार आहे. राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस मुख्यालयालयातील सहआयुक्त सुनील कोल्हे, ठाणे येथील वायरलेस विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू, ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांचा त्यात समावेश आहे. तर ४२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानीत करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती शौर्य पदकप्राप्त अधिकारी-कर्मचारी
राष्ट्रपती शौर्य पदकांपैकी ३६ पदके गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या आणि मरणोत्तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत. मनीश कलवानिया (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद), भाऊसाहेब ढोले (पोलीस उपअधीक्षक, गडचिरोली), समीर शेख (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली), संदीप मंडलिक (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गडचिरोली), दयानंद महाडेश्वर (पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई), महारुदार परजाने (पोलीस उपनिरीक्षक, बीड), राजाराम खैरनार (पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई), राजू कांदो (पोलीस नाईक, गडचिरोली), अविनाश कुमरे (पोलीस शिपाई, गडचिरोली), गोंगलू तिम्मा (पोलीस शिपाई, गडचिरोली), संदीप भांड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गडचिरोली), मोतीराम मडवी (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली) यांचा समावेश आहे. तर, जगदेव मडावी (पोलीस हवालदार, गडचिरोली), धनाजी होनमाने (पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली), किशोर आत्राम (पोलीस शिपाई, गडचिरोली) या तिघांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात येणार आहे.

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी-कर्मचारी
नितीन पोतदार (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफर्ड मार्केट), श्रीकांत आदाटे (पोलीस निरीक्षक,पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ), राजेंद्र कोळी, (सहाय्यक पोलीस निरीक्षक फोर्स वन, गोरेगाव), सुनील कुवेसकर (पोलीस उपनिरीक्षक, मुख्य नियंत्रण कक्ष भायखळा), शंकर गावकर (पोलीस उपनिरीक्षक, सागरी पोलीस ठाणे, माहीम), जितेंद्र मोहिते (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर), राजेंद्र शिरके (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा, वांद्रे), सुरेश कदम ( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, विक्रोळी), धनराज तळेकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, बोरिवली), अशोक भोनवडे (गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.