आमदार रवी राणा आणि त्यांची खासदार पत्नी नवनीत राणा यांनी मुंबईमधील मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आंदोलन मागे घेतलं आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये असं सांगत त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र या आंदोलनादरम्यान रवी राणांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर दिल्याचं पुण्यातील पत्रकार परिषदेत पहायला मिळालं.

नक्की वाचा >> मातोश्री समोरील राणा दांपत्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे का?; चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, “आमचा पाठिंबा त्या…”

“राणा असं म्हणतायत की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी या सागळ्यामध्ये लक्ष घालवं. सध्याची राज्यामधील परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे. तुम्हाला वाटतं का राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आलेली आहे?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या पोटात इतकी भीती आहे की काहीही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट आठवते,” असं पाटील म्हणाले.

तसेच पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी, “आम्ही काही राष्ट्रपती राजवटीची मागणीही केलेली नाहीय. आम्ही व्हाया राज्यपाल राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं नाहीय. पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं नाहीय,” असं सांगितलं. त्याचप्रमाणे, “राणाजी कशाला सामन्य माणसालाही अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी,” असंही पाटील म्हणाले. “आम्ही काही अशी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. त्याचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> हनुमान चालिसा राक्षस चालिसा आहे का? विचारत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मातोश्री, राणांच्या घराबाहेर जे काही चाललंय त्याचा…”

दरम्यान राणा यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट राणांवर निशाणा साधला. “राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे असे बाळासाहेबांनी म्हटले आहे,” असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “शिवसेना एक शक्ती आहे. त्याचा चटका तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जे होत आहे ते एकदाच होईल. बायकांच्या आडून भाजपा शिखंडीचे उद्योग करते आहे. हे बंद करा,” असं राऊत म्हणाले.