pressure remove governor Uddhav Thackeray warning agitation Pawar criticism of Koshyaris ysh 95 | Loksatta

राज्यपालांना हटविण्यासाठी दबाव; उद्धव ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा, पवारांची कोश्यारींवर टीका

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानामुळे निर्माण झालेला वाद अद्याप शमला नसून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव वाढविला आहे.

uddha thackrey sharad pawar koshyari
उद्धव ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा, पवारांची कोश्यारींवर टीका

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानामुळे निर्माण झालेला वाद अद्याप शमला नसून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव वाढविला आहे. राज्यपालांना दोन-चार दिवसांमध्ये न हटविल्यास ‘महाराष्ट्र बंद’सारखे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. तर राज्यपालांनी पदाच्या मर्यादा ओलांडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आणि आदर्श असून त्याबाबत कोणताही वाद होऊ शकत नाही, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना हटविण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले, ‘वृद्धाश्रमात जागा नाही म्हणून राज्यपाल करता का? बाप हा बाप असतो, नवा की जुना असा प्रश्न नसतो. राज्यपाल ‘अ‍ॅमेझॉन’ वरुन आलेले पार्सल आहे. ते परत बोलवा, नाहीतर आम्ही आमच्या पध्दतीने पाठवू.’

निर्णय घ्या – शरद पवार

शरद पवार  म्हणाले, की वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायचे असते व भूमिका घ्यायची असते. पण याचे स्मरण नसलेली व्यक्ती केंद्र सरकारने पाठविली आहे.

छत्रपतींच्या नावावर राजकारण करु नये – फडणवीस

आपल्यासमोर घटना घडूनही आपण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, हे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्यावर शरद पवार यांच्या लक्षात आले आणि ते खडबडून जागे झाले. पवार बोलल्यावर उद्धव ठाकरे यांनीही बोललेच पाहिजे, त्यामुळे तेही बोलले, असे फडणवीस म्हणाले. उदयनराजेंचे पंतप्रधानांना पत्र : खुद्द भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही शिवसेना-राष्ट्रवादीच्या ‘राज्यपाल हटाओ’च्या मागणीत सूर मिसळला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोश्यारींना हटविण्याची मागणी केली. भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी भान ठेवून बोलण्याची अपेक्षा राज्यपालांकडून व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 00:02 IST
Next Story
महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची सक्ती