फटाक्यांना मागणी, पुरवठा मात्र कमी ; आवक कमी असल्याने १० ते १५ टक्के दरवाढ

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनल्यामुळे मुंबईकर फटाके खरेदीसाठी गर्दी गरू लागले आहेत.

नीलेश अडसूळ/ समीर कर्णुक, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गाची धास्ती आणि आर्थिक घडी विस्कळीत झालेली असतानाही दिवाळीनिमित्त फटाके खरेदी तेजीत आली आहे. मात्र गेले दीड वर्ष फटाके निर्मितीला बसलेला फटका आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे होऊ न शकलेले उत्पादन यांमुळे यंदा बाजारात काही ठरावीकच फटाके उपलब्ध झाले आहेत. परिणामी, ग्राहकांकडून होणाऱ्या फटाक्यांच्या मागणीची पूर्तता करताना विक्रेत्यांची धांदल उडाली आहे. तर अपुऱ्या साठय़ामुळे फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. 

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनल्यामुळे मुंबईकर फटाके खरेदीसाठी गर्दी गरू लागले आहेत. पाऊस, भुईचक्र, सुरसुरी, आकाशात झेपावणारे रॉकेट, फुलबाजी तसेच मोठा आवाज न करणाऱ्या फटाक्यांना मागणी वाढू लागली आहे. मात्र करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे गेल्या दीड वर्षांमध्ये फटाके निर्मितीला फटका बसला आहे. त्यामुळे उपलब्ध फटाक्यांच्या विक्रीवर विक्रेत्यांनी भर दिला आहे. तर मनाजोगे फटाके मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये थोडासा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे, तर अपुऱ्या साठय़ामुळे फटाक्यांच्या किमतीही वाढल्या असून नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

 गेल्या आठ दिवसांपासून ग्राहक फटाके खरेदी करण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा चांगला व्यवसाय होईल, असा आशावाद मुंबईतील फटाक्यांचे घाऊक विक्रेते ‘इसाभाई फटाकेवाला’चे अब्दुल्ला घीया यांनी व्यक्त केला. यंदा मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीत आणखी वाढ झाली तर फटाके कमी पडतील असे चित्र आहे, असेही घीया यांनी सांगितले. गेली चाळीस वर्षे या व्यवसायात आम्ही आहोत. गेल्या वर्षी मोठा फटका बसला होता. गेल्या आठ दिवसांपासून ग्राहक फटाके खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे यंदा व्यवसाय होईल अशी आशा आहे,’ अशी प्रतिक्रिया काळाचौकी येथील िशदे बंधू फटाका उद्योगाचे रमेश िशदे यांनी व्यक्त केली.

शिवकाशी येथे काही दिवस कडकडीत टाळेबंदी होती. त्यामुळे फटाक्यांचे उत्पादन कमी झाले. घाऊक विक्रेत्यांनाही टाळेबंदीच्या भीतीने कमी फटाके विक्रीला आणले, असे मुंबई-ठाणे फायरवर्क डिलर वेल्फेअर असोसिएशनचे मिनिष मेहता यांनी सांगितले.

पुणे, रायगड, वाडा, मुरबाड या परिसरात घाऊक दरात फटाके मिळतात. मात्र यंदा अनेक व्यापाऱ्यांकडे पुरेसे फटाके उपलब्ध नाहीत. त्यामुळे नेमकेच फटाके विक्रीसाठी उपलब्ध असून फटाक्यांच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे, असे फटाके विक्रेते मनोज ठाणगे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Price of firecrackers increase by 10 to 15 percent due to supply hit zws

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या