मुंबई : राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या कामकाजासाठी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक आरोग्य संस्थांमध्ये प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक व उपचारात्मक अशा १३ प्रकारच्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, निदान चाचण्या व वैद्यकीय साहित्याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी जनआरोग्य समित्यांचीही रचना करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांत गर्भवती महिला व प्रसूतीसंबंधित सेवा, नवजात बालक व बालआरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, नवजात बालकांना निर्धारित वेळापत्रकानुसार लसीकरण, बालकांमधील ताप, खोकला, अतिसार यांवर उपचार व कुपोषण प्रतिबंधक उपाययोजना, दंतोपचार, नेत्ररोग, कान-नाक-घसा तपासणी, आपत्कालीन उपचार व उपशामक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, क्षयरोग, कुष्ठरोग व एचआयव्ही यांसारख्या संसर्गजन्य आजारांबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब व विविध प्रकारच्या कर्करोगविषयक तपासणीही केली जाईल. आरोग्य केंद्रांची उभारणी करताना लोकसंख्या व अंतराचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. बिगर आदिवासी भागात ३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच हजार लोकसंख्येमागे एक उपकेंद्र असेल.

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २५ किलोमीटर, तर उपकेंद्रासाठी सहा किलोमीटर अंतराचा निकष आहे. आदिवासी भागात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन हजार लोकसंख्येमागे एक उपकेंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अनुक्रमे १५ व चार किलोमीटर अंतराचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ पदांचा आकृतीबंध

प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आदिवासी व बिगर आदिवासी अशा दोन्ही क्षेत्रांत १५ पदांचा मनुष्यबळ आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी गट अ व गट ब, आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका प्रसविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, सफाईगार व स्त्री व पुरुष परिचर यांचा समावेश आहे. उपकेंद्रासाठी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व अंशकालीन स्त्री परिचर अशी पदे मंजूर आहेत. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.

२२८ अत्यावश्यक औषधे, ६४ प्रकारच्या चाचण्या

प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहण्यासाठी २२८ अत्यावश्यक व १९९ ऐच्छिक अशा एकूण ४२७ औषधांची यादी निश्चित केली आहे. त्यात प्रतिजैविके, मधुमेह व रक्तदाबावरील औषधे, हृदयविकार, क्षयरोग, कुष्ठरोग व मानसिक आजारांवरील औषधे, वेदनाशामक औषधे, लसी व जीवनसत्त्वांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत हिमोग्लोबिन, रक्तपेशी व प्लेटलेट्सची मोजणी, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, किडनी व यकृताच्या तपासण्या, थायरॉइड, एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिवताप, डेंग्यू, क्षयरोग व गर्भधारणा अशा ६४ तपासण्या करण्यात येतील. उपकेंद्र स्तरावर १४ प्रकारच्या निदान चाचण्या उपलब्ध केल्या आहेत.

जनआरोग्य समित्यांकडे देखरेखीची जबाबदारी

आरोग्य संस्थांचे कामकाज पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी जनआरोग्य समित्यांची रचना करण्यात आली आहे. उपकेंद्र स्तरावरील समितीचे अध्यक्ष संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, तर समुदाय आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद सदस्याकडे असेल.