मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि हिंदूत्व एवढेच भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे नाही. त्यास स्थानिक पातळीवर खंदे नेतृत्व आणि सुशासनाची जोड असायला हवी, असे परखड विवेचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या ‘द ऑर्गनायझर’ या नियतकालिकात करण्यात आले आहे.
‘‘कर्नाटकमध्ये भाजपचा झालेला पराभव हा धक्कादायक नसला तरी अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. या पराभवाचे विश्लेषण करताना वेगवेगळी मते व्यक्त झाली आहेत. मोदींचे नेतृत्व, करिष्मा आणि हिंदूुत्व हा भाजपची विचारधारा सांगणारा मुख्य मुद्दा किंवा जमेची बाजू खचितच आहे. पण, त्याला स्थानिक पातळीवरील उमद्या नेतृत्वाची आणि जनतेपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोचविणाऱ्या सुशासन देणाऱ्या नेतृत्वाची जोड असली पाहिजे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल, की ज्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याला जनतेपुढे उत्तर देण्याची वेळ भाजपवर आली. भाजपने आपली विचारधारा, केंद्रीय योजनांचे लाभ आणि राष्ट्रीय मुद्दय़ांवर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला खरा, पण काँग्रेसने ही निवडणूक स्थानिक मुद्दय़ांवरच अधिक केंद्रित ठेवली आणि विजय संपादन केला’’, असे परखड मतप्रदर्शन संपादक प्रफुल्ल केतकर यांनी या विश्लेषणात केले आहे.
‘‘कर्नाटकमध्ये मोठय़ा प्रमाणावर मतदान वाढले, पण भाजपच्या मतांमध्ये आधीच्या निवडणुकांपेक्षा खूप जास्त वाढ झालेली नाही. त्यामुळे अधिक जागा मिळू शकल्या नाहीत. लोकसभेत ‘सेन्गोल’ प्रतिमा, मणिपूर हिंसाचार आणि अन्य मुद्दे हिंदू गटांकडून व इतरांकडून निवडणुकीआधी काही आठवडे प्रचारात उपस्थित झाले. भाजपने राष्ट्रीय मुद्दय़ांवर प्रचार ठेवला, तरी काँग्रेसने स्थानिक मुद्दय़ांना अधिक महत्व दिले. पण, मंत्र्यांच्या कारभाराविरोधात जनतेची नाराजी ही भाजपच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असे मत लेखात व्यक्त करण्यात आले आहे.
चिंतनाची योग्य वेळ’
काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत अपेक्षेहून अधिक यश मिळाल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचे मनोधैर्य उंचावले आहे. मात्र, भाजपला पराभवाचे आणि प्रचाराचे योग्य विश्लेषण व चिंतन करण्याची ही योग्य वेळ आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे लेखात म्हटले आहे.